Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी वर्षभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ; २ हजार ७५२ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:53 PM2021-03-18T20:53:19+5:302021-03-18T20:53:37+5:30
शहरात आजपर्यंत १२ लाख ८६ हजार ७६१ हजार जणांची कोरोना तपासणी
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची वाढ सातत्याने होत असून, गेल्या वर्षभरात सर्वाधिक रूग्णवाढ एकाच दिवसात म्हणजे गुरूवारी (दि़१८ मार्च) आढळून आली आहे. आज दिवसभरात तब्बल २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २३.२५ टक्के इतकी आहे.
दरम्यान, आज दिवसभरात मृत्यूची संख्याही वाढली असून, आज शहरातील २२ जणांचा तर शहरात उपचार घेणाऱ्या पुण्याबाहेरील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही सातत्याने वाढत असून आजमितीला शहरात १६ हजार ८७७ सक्रिय रूग्ण आहेत.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये दिवसभरात ११ हजार ८३५ जणांनी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे. सध्या शहरात ४४० गंभीर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ८४६ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार चालू आहेत. आज दिवसभरात ८८५ जण कोरोनामुक्त झाल्याचीही नोंद घेण्यात आली आहे.
शहरात आजपर्यंत १२ लाख ८६ हजार ७६१ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख २६ हजार ५४९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ४ हजार ६७० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज २२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, शहरातील एकूण मृत्यूची संख्या आता पाच हजाराच्या पुढे गेली असून, गेल्या वर्षभरात ५ हजार २ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
=================