Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ४२८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; २६२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 08:12 PM2021-02-17T20:12:34+5:302021-02-17T20:26:22+5:30
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे
पुणे : शहरातील नव्या कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला असून, बुधवारी शहरात कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. २८ नाव्हेंबरनंतर शहरात प्रथमच आज ४२८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ९़९४ टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यानंतरची शहरातील ही सर्वाधिक रूग्णवाढ आहे.शहरातील कोरोना तपासणीचे प्रमाणही बुधवारी वाढले असून, शहरातील १७ स्वॅब सेंटरवर दिवसभरात ४ हजार ३०४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या १ हजार ८८१ वर गेली असून, २९० रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर विविध रूग्णालयांमध्ये १४५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरात आजपर्यंत १० लाख ८१ हजार ११५ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९५ हजार ९२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार २३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.