Corona virus news : पुण्यामध्ये डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:23 AM2020-10-10T11:23:00+5:302020-10-10T11:23:22+5:30
पुणे महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा..
पुणे : पुण्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आलेल्या द्विसदस्यीय शिष्टमंडळाने डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पालिकेने तयारी करावी. खाटांच्या उपलब्धतेविषयी सतर्क राहावे अशा प्रकारच्या सूचना या शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाला केल्या आहेत. यासोबतच पालिकेने उभे केलेले 'इन्फ्रास्ट्रक्चर', रुग्णालयातील सुधारणा, खाटांचे नियोजन आणि कोरोना रुग्णांवर योग्यरित्या उपचार होण्यासंदर्भात राबविलेल्या उपाययोजनांविषयी या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका सक्षमपणे काम करीत असल्याचे निरीक्षण या शिष्टमंडळाने नोंदवले. यासंदर्भात शिष्टमंडळातील सदस्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पुण्यामध्ये समाधानकारक काम झाल्याचे सांगितले. पुण्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी शहरात आलेल्या डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. बॅनर्जी यांनी गेल्या चार दिवसात पुण्यातील विविध कोविड सेंटरमध्ये भेट दिली.
शहरातील उपाययोजनांची माहिती घेऊन महापालिकेत बैठका घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ६ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला त्यांचा दौरा शुक्रवारी संपला. तपासण्या वाढविण्यापेक्षा आवश्यकतेनुसारच तपासण्या करण्याचे निर्देश या पथकाने दिले. आयसीएमआरच्या तपासणी बाबतच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या ही सूचना दिल्या. 'को-मॉर्बिड अर्थात कोरोना व्यतिरिक्त अन्य व्याधी असलेल्या रुग्णांचे अधिकाधिक सर्वेक्षण करून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध होतील आणि त्यांच्या जीवितास असलेला धोका टळेल याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.
तपासण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. रुग्ण संख्येची टक्केवारी पाहता रुग्ण संख्या घटल्याचे दिसत आहे. पुण्यामध्ये दिवसाला दोन हजार रुग्ण आढळून येत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून दिवसाला सातशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत ही सकारात्मक बाब आहे. रुग्ण वाढीचा दर आणखी कमी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पुण्यातील जम्बो रुग्णालय आणि अन्य कोविड सेंटरमध्ये तसेच खाजगी रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारांची त्यांनी माहिती घेतली. रुग्णांना खाटा उपलब्ध होत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांसोबत तसेच रूग्णांसोबत संवाद साधल्यावर त्यांनी आरोग्य व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केल्याचे सांगितले. नागरिकांनीही सर्व प्रकारची काळजी घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले.