Corona virus News : केंद्र शासनाच्या शिष्टमंडळाकडून पुण्यातील कोविड उपाययोजना आणि सद्यःस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:31 AM2020-10-08T11:31:21+5:302020-10-08T11:32:35+5:30
रुग्णांची संपूर्ण माहिती ठेवण्याच्या आणि मृत्युदर कमी करण्याकरिता काय करता येईल याबाबत मार्गदर्शन
पुणे : शहरातील कोविड उपाययोजना आणि सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने एक शिष्ठमंडळ आले असून नागपूर एम्सचे डॉ. अरविंद कुशवाह यांच्या शिष्ठमंडळाने जम्बो रुग्णालयाची पाहणी केली. तसेच पालिकेत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची माहिती दिली.
जम्बो कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ. कुशवाह यांनी संपर्क साधून संवाद साधला. तसेच जेवणाचा दर्जा योग्य असल्याची खात्री करून घेतली. दाखल रुग्णांची संपूर्ण माहिती संगणकावर नोंद करण्यात यावी. त्यामुळे रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर ६ महिन्यानंतर देखील काही त्रास झाल्यास या माहितीचा उपयोग पालिकेला तसेच रुग्णाला होऊ शकतो. संपूर्ण माहिती ठेवण्याच्या आणि मृत्युदर कमी करण्याकरिता काय करता येईल याबाबत डॉ. कुशवाह यांनी मार्गदर्शन केले.
रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांकडून जम्बोमधील सोयी सुविधांची माहिती घेतली. ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडची व्यवस्था, कमांड सेंटरमधील माहिती तंत्रज्ञान प्रणाली, जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, उपायुक्त राजेंद्र मुठे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, डॉ. अंजली साबणे आदी अधिकारी उपस्थित होते.
------
महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी माहिती दिली. बैठकीत डॉ. अरविंद कुशवाह यांच्यासह शासनाचे वैद्यकिय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी पालिकेचे अधिकारी, कोविड सेंटरचे प्रमुख, विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले.