Corona Virus News : पुण्यातील सिंहगड हॉस्टेल कोविड केअर सेंटर 'विशेष' रुग्णांसाठी ठरतेय आधारवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 11:36 AM2020-10-07T11:36:25+5:302020-10-07T11:37:28+5:30
जन्मजात अथवा अपघाताने शारीरिक व मानसिक व्यंग आलेल्या रुग्णांसाठी सिंहगड हॉस्टेल कोविड सेंटर आधारवड ठरत आहे..
पुणे : कोरोनामुळे एकीकडे जवळची नाती दूर पळत असतानाच दुसरीकडे कोविड सेंटरमधील हजारो हात रूग्णांची सेवा करीत आहेत. अशाच कोंढव्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या 'विशेष' रूग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये ऑटीझम, मल्टीपल डाऊन सिंड्रोम, सक्लेरोसीस या प्रकारातील म्हणजे ज्याला स्वतःच्या दैनंदिन क्रिया करण्यासाठीही दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते अशा रुग्णांवर आईच्या ममतेने उपचार केले जात आहेत.
जन्मजात अथवा अपघाताने शारीरिक व मानसिक व्यंग आलेल्या रुग्णांसाठी सिंहगड हॉस्टेल कोविड सेंटर आधारवड ठरत आहे. गेल्या सहा महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अविरत सेवा देत असलेल्या या सेंटरच्या प्रमुख डॉ. दिप्ती बच्छाव व डॉ. किरण लाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वैद्यकीय विभाग या 'विशेष रुग्णांना' कुटुंबातील सदस्यांप्रमाणे उपचार आणि आधार देत आहेत.
या रुग्णांना अगोदरपासून सुरु असलेली (कोरोना उपचाराव्यतिरिक्तची) औषधे वेळेवर दिली जात आहेत का?, त्यांना मिळणारा आहार ठरवलेल्या वेळेत मिळत आहे का? याची विशेष काळजी घेतली जात आहे. यासोबतच ते व्यक्त करू शकत नसलेली त्यांच्या आरोग्याची समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या संस्थेमधील व्यक्तींसोबत संपर्क साधला जातो. उपजत लाजाळूपणा असणारे हे रुग्ण दोन-तीन दिवसांच्या सहवासानंतर वैद्यकीय टीमला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.
समाजापासून नेहमीच वेगळे असलेले आणि नियतीचा घाला सोसलेले या विशेष व्यक्ती बऱ्या होण्यासाठी सर्वजण आपुलकीने काम करीत आहेत. हे रुग्ण प्रत्यक्ष बोलून आपली भावना व्यक्त करू शकत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाची भावना येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अनुभवत आहेत.
सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या सर्वच वयोगटाच्या रुग्णांवर दक्षता घेऊन उपचार केले जातात. पण दुसऱ्याचा आधार घेऊन जीवन जगत असलेल्या स्वमग्न रुग्णांवर उपचार करत असताना प्रसंगी डॉक्टरी अभिनिवेश बाजूला ठेऊन त्यांच्याच भाषेत संवाद साधून आरोग्यविषयक माहिती घ्यावी लागते.
-------
सिंहगड हॉस्टेल सेंटरमध्ये सध्या उमेद संस्थेतील ५ रुग्ण दाखल असून, ४ रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन डिस्चार्ज झाले आहेत. या रुग्णांवर उपचार करताना समाजाचे आपण देणे लागतो ही भवना आम्हा सर्वच अधिकारी सेवकांमध्ये वाढत आहे.
- डॉ.दिप्ती बच्छाव, सेंटरप्रमुख, सिंहगड हॉस्टेल कोविड सेंटर, कोंढवा