Corona virus : राहायला घर नाही; खायला अन्न नाही अन् हाताला काम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:44 PM2020-04-01T12:44:27+5:302020-04-01T12:45:44+5:30
लाखभर स्थलांतरितांचा आक्रोश : बेघरांच्या तर हालांना पारावर नाही
राजू इनामदार
पुणे : कारखाने बंद, बांधकामे बंद, लहान-मोठे उद्योग व्यवसाय बंद! यामुळे हजारो कामगारांचा मोठा प्रश्न कोरोना निर्मूलनासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झाला आहे. काही स्वयंसेवी संस्था, संघटना, वैयक्तिक स्तरावर काम करणारे कार्यकर्ते वगळता कोणाचेही या विषयाकडे लक्ष नाही.
पुणे शहर तसेच परिसरात काही लाख लोक या कामांसाठी म्हणून परगाव, परराज्यातून आलेले आहेत. एखादी खोली घेऊन चारपाच जणांनी एकत्र रहायचे, दिवसरात्र काम करायचे, पैसा साठवायचा व तो घराकडे पाठवून कुटुंब जगवायचे अशी त्यांची पद्धत आहे. स्वत:ला रहायला, खायला, प्यायला चांगले काही नसले तरी त्यांना चालते. काम मात्र त्यांना रोजच्या रोज हवे असते व त्यातून मिळणारे पैसेही. कारण त्यासाठीच त्यांनी राहते गाव सोडलेले असते.
लॉकडाऊनमुळे या सर्वांसमोरच तगून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रीय एकात्मता समितीच्या माध्यमातून नितीन पवार यासाठी काम करतात. त्यांना ओंकार मोरे, चंदनकुमार, नीलेश वाघमारे, चेतन ववळे हे साह्य करतात. हडपसर परिसरात फिरून हांडेवाडी व अन्य काही ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांची माहिती घेतली असता त्यांना तब्बल १ हजार कामगार बेघर सापडले. ठेकेदार पळून गेलेला, हातातील पैसे संपलेले, साठवलेले धान्यही संपले, आता करायचे तरी काय व जायचे तरी कोणाकडे अशा चिंतेत हे सगळे होते. कोणीही त्यांची साधी विचारपूसही करायला तयार नव्हते.
संतूलन संस्थेचे प्रा. बी. एम. रेगे मागील २३ वर्षांपासून अशा स्थलांतरित मजुरांसाठी काम करत आहेत. ते म्हणाले, ‘‘पुण्यात १ लाखच काय, त्यापेक्षा जास्त संख्येने असे लोक आहेत. त्यांच्या आरोग्य तसेच दैनंदिन राहण्याची नेहमीच हेळसांड होते, कोरोना काळात तर त्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. संस्था त्यांना सध्या अन्नधान्याचा पुरवठा करत आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही व्यवस्था आहे. पुण्याच्या चारही बाजूंना असे लोक आहेत. संस्था त्यांचा शोध घेते व त्यांच्यासाठी काम करते. आंध्र, उत्तर प्रदेश, बिहार इथून सर्वाधिक लोक आलेले आहेत. त्यांचे ठेकेदार पळून गेले आहेत. त्यामुळे सगळेच हवालदिल झाले आहेत. भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोल्याही त्यांना सोडून द्यावा लागल्या असल्यामुळे रहायचे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.’’