Corona virus : आता होम क्वारंटाईन नाही; लक्षणे आढळली की थेट पालिकेचा विलगीकरण कक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:00 AM2020-04-17T07:00:00+5:302020-04-17T07:00:06+5:30

आत्तापर्यंत सर्दी,खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन च्या सूचना देण्यात येत होत्या.

Corona virus : No a home quarantine ; Symptoms found person directly shift into the municipality detachment room | Corona virus : आता होम क्वारंटाईन नाही; लक्षणे आढळली की थेट पालिकेचा विलगीकरण कक्ष 

Corona virus : आता होम क्वारंटाईन नाही; लक्षणे आढळली की थेट पालिकेचा विलगीकरण कक्ष 

Next
ठळक मुद्देआता या सील केलेल्या भागात आरोग्य सर्वेक्षणाचे काम अधिक जोमाने धोका टाळण्यासाठी कोरोना संशयित व्यक्तीस थेट कोविद केअर सेंटरमध्ये

नीलेश राऊत -
पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे महापालिकेने शहरातील बहुतांशी भाग सील असून, प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणीचे काम हाती घेतले आहे. आजपर्यंत कोरोना आजाराशी संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीस हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन (घरातच विलग राहण्याच्या सूचना) च्या सूचना करण्यात येत होत्या. परंतू, गेल्या दोन तीन दिवसांतील कोरोनाबाधितांचा वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना संबंधित आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीची पालिकेच्या कोविद केअर सेंटर तसेच क्वारंटाईन कक्षात रवानगी करण्यात येणार आहे़.    
    कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वैद्यकीय पथकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. प्रारंभी याव्दारे सर्दी, खोकला, ताप आदी कोरोनाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला घरीच राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. दरम्यानच्या काळात पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. परिणामी हा सर्व मध्यवर्ती भाग सील केला गेला व त्यापाठोपाठ शहरातील अन्य २८ ठिकाणेही पूर्णपणे सील केली गेली आहेत. आता या सील केलेल्या भागात आरोग्य सर्वेक्षणाचे काम अधिक जोमाने करण्यात येत असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी कोरोना संशयित व्यक्तीस थेट पालिकेने शहराच्या विविध भागात सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये पालिकेच्या वाहनांमधून हलविण्यात येत आहे. 
    आत्तापर्यंत सर्दी,खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन च्या सूचना देण्यात येत होत्या. पण आता अशा प्रत्येक व्यक्तीची या कोव्हिड केअर सेंटरमध्ये (सीसीसी फ्ल्यू क्लिनिक) नेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी रक्षकनगर क्रीडा संकुल (खराडी), लायगुडे दवाखाना (वडगाव धायरी), शिवरकर प्रसुतीगृह (वानवडी) कै़ मिनाताई ठाकरे प्रसुतीगृह (कोंढवा) व सणस मैदान होस्टेल येथे रवानगी करण्यात येणार आहे. येथे प्रत्येकाच्या घशातील स्त्रावाचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जोपर्यंत हे तपासणी अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना येथेच ठेवण्यात येणार आहे. तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तरच पुढील उपचाराच्या सूचना देऊन त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी केवळ सौम्य प्रकारची लक्षणे असलेल्या रूग्णांचे उपचार करण्यात येणार आहे. या पाच सेंटरमध्ये ९५३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
वरिल तपासणीत कोरोना आजाराशी साम्य असलेली मध्यम स्वरूपाची लक्षणे ज्या व्यक्तींना आढळून आली आहे अशा सर्व व्यक्तींना (डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर डीसीएचसी)  ससून सर्वोपचार रूग्णालयात औंध जिल्हा रूग्णालय, भारती हॉस्पिटल, सिम्बॉयसिस हॉस्पिटल, डॉ़नायडू हॉस्पिटल या शासकीय व शासकीय पॅनेलवरील मान्यताप्राप्त  रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे. याच पाचही ठिकाणी ९५३ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे़. 
     तसेच रूबी हॉल क्लिनिक, जहॉगिंर हॉस्पिटल, कोलंबिया एशिया हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन, सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल हडपसर, सुर्या हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी, केईएम हॉस्पिटल अशा १० ठिकाणी हलविण्यात येणार आहे. यासर्व ठिकाणी कोरोना संशयित रूग्णांसाठी २७० स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, ६१ अतिदक्षता खाटा (आय़सी़यू) ची व्यवस्था करण्यात आली आहे.
तर ससून सर्वोपचार रूग्णालय, सिम्बॉयसिस हॉस्पिटल लवळे, भारती हॉस्पिटल (डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल डीसीएच) येथे तीव्र प्रकारची लक्षणे असलेल्या रूग्णांचे उपचार करण्यात येणार आहे. याठिकाणी ८५ अतिदक्षता खाटांची (आय़सी़यू) व्यवस्था करण्यात आली आहे. 

Web Title: Corona virus : No a home quarantine ; Symptoms found person directly shift into the municipality detachment room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.