Corona virus : पुणे शहरातील खासगी वाहनांची नोंद दोन वर्षांत घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 07:39 AM2020-08-01T07:39:04+5:302020-08-01T07:41:15+5:30
मागील १५ वर्षांत तब्बल २७ लाख ८२ हजार ८०२ खासगी वाहनांची वाढ
पुणे : पालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरातील खासगी वाहनांच्या नोंदीचे प्रमाण यंदा घटले असून गेल्या पाच वर्षात सार्वजनिक वाहनांच्या संख्येत २.४ पटीने वाढ झाली आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस या वाहनांचा समावेश असून पर्यावरण अहवालानुसार, शहरात गेल्या दोन वर्षात नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झाली आहे.
यासोबतच दुचाकी खरेदीचे प्रमाणही खाली आले आहे. मार्च २०२० पर्यंत शहरातील एकूण दुचाकींच्या नोंदणीची संख्या १ लाख ६७ हजार ४०६ आहे. मार्च २०१९च्या तुलनेत ८ हजार ९०८ ने ही संख्या घटली आहे. यासोबतच मार्च २०२० पर्यंत शहरात ४६ हजार १५० मोटारींची नोंद झाली असून मार्च २०१९ च्या तुलनेत ही संख्या १ हजार ४६७ ने घटली आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्याने खासगी वाहनांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. रस्त्यांवरील वाहतुकीचे प्रमाण आणि रस्त्यांची क्षमता यांचे गुणोत्तर ०.८ इतके अपेक्षित आहे. मात्र, खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे गुणोत्तर सध्या १.४ इतके झाले आहे. त्याची परिणीती वाहतुकीची गती कमी होण्यात झाली आहे. एक लाख लोकसंख्येमागे ५५ बस अपेक्षित आहेत. मात्र, हे प्रमाण २८ बस पुरतेच मर्यादित आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या फेऱ्या ४८ टक्के असणे अपेक्षित आहे.
........
रिक्षा, टॅक्सी, कॅब, बसेस या वाहनांची संख्या २०१५ साली ५९ हजार २४६ एवढी होती. तर पाच वर्षात म्हणजे २०२० पर्यंत या वाहनांच्या संख्येत २.४ पटीने वाढ होऊन ती १ लाख ४१ लाख २६५ झाली आहे. ३० लाख ४६ हजार दुचाकी वाहने आहेत.
----------
गेल्या १५ वर्षांत वाढली २७ लाख वाहने
२००६ मध्ये नोंदणीकृत खासगी वाहनांची एकूण संख्या १३ लाख ५३ हजार ११३ होती. मार्च २०२० पर्यंत नोंदणीकृत वाहनांची एकूण संख्या ४१ लाख ३५ हजार ९१५ इतकी आहे. मागील १५ वर्षांत तब्बल २७ लाख ८२ हजार ८०२ खासगी वाहनांची वाढ झाली आहे.