Corona virus : कोरोनाच्या मृत्युदराबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही : डॉ. अनंत फडके
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:56 PM2020-04-30T15:56:48+5:302020-04-30T15:57:46+5:30
आपल्याकडील मृत्युदर जास्त नाही, हे वर्षभरानंतर आपल्या लक्षात येईल.
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सुरुवातीला १ ते २ टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संशोधनाअंती मृत्युदर 0.02 टक्के इतकाच होता, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. कोरोनाच्या बाबतीत 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक, उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलता असे आजार असलेले रुग्ण यांना लागण होण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांची आपल्याला खास काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच आपल्याकडील मृत्युदर जास्त नाही, हे वर्षभरानंतर आपल्या लक्षात येईल. लागण झालेल्यापैकी 99 टक्के लोक हे पूर्णपणे बरे होणार आहेत. त्यामुळे मृत्युदर पाहून आपण घाबरून जाण्याची गरज नाही, असे मत जनआरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सहा आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांचे खूपच हाल होत आहेत. या बाबतीतही शासन शासन पातळीवर गांभीयार्ने विचार व्हायला हवा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
------
१) कोरोनामुळे होणा?्या मृत्यूदराचे विश्लेषण कशा पद्धतीने करता येईल?
- एखादी साथ पसरते तेव्हा ५० % लोकांना लागण होऊनही काहीच लक्षणे दिसत नाहीत. अशा लोकांच्या रक्तामध्ये त्या आजाराविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते. उर्वरित पन्नास टक्के रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे दिसतात. त्यामध्येही ८०% रुग्णांमध्ये ही लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. १५ % लोकांना मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसतात आणि फक्त ५ % लोकांमध्ये तो आजार गंभीर स्वरूपाचा होतो आणि त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. म्हणजेच लागण झालेल्या रुग्णांपैकी एक टक्के लोकांचा मृत्यू होतो. सध्या मृत्युदराचे विविध आकडे पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपल्याकडील मृत्यूदर जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लागण झालेल्या रुग्णांपैकी किती लोकांचा मृत्यू झाला, हे सांगणे सध्या अवघड आहे. कारण, अद्याप आपण लागण झालेल्या सर्व रुग्णांपर्यंत पोहोचू शकलेलो नाही. हा अभ्यास पूर्ण होईल, तेव्हा मृत्युदर प्रत्यक्षात एक टक्क्यापर्यंत कमी असल्याचे लक्षत येईल.
* आपल्याकडे हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे का?
- तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या 60 ते 70 टक्के लोकांमध्ये आजाराविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. त्यामुळे उरलेल्या 30 ते 40 टक्के लोकांचे या आजारापासून आपोआपच संरक्षण होणार आहे. यालाच हर्ड इम्युनिटी अर्थात समूह प्रतिकारशक्ती असे म्हटले जाते. हर्ड इम्युनिटी निर्माण झाल्यास हा अधिक प्रमाणात नियंत्रणात येणार आहे. त्यासाठी आपल्याला सध्या सुरू असलेले प्रयत्न अधिक वेगाने करावे लागतील. जास्तीत जास्त लोकांचे लवकरात लवकर निदान करणे, त्यांचे विलगीकरण करणे, उपचार देणे, त्यांना सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ न देणे आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना दोषी अथवा गुन्हेगार न समजता त्यांना मदतीचा हात देणे, या गोष्टी कराव्या लागतील.
३) लॉकडाऊननंतरचे चित्र कसे असू शकते?
- सध्याच्या परिस्थितीत अजिबात घराबाहेर न पडणे, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर जाणे, दोन व्यक्तींमध्ये किमान दोन मीटर सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे आणि सातत्याने हात धुणे या सर्व गोष्टी पाळल्या तर आपण साथीचा वेग कमी करू शकू. या सर्व गोष्टींचे पालन न केल्यास पुढील काही काळात रुग्णांची संख्या लाखोंनी वाढली तर त्यातील दहा टक्के रुग्णांना सामावून घेण्याइतकीही आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता नाही. रुग्णांची संख्या एकदम न वाढल्यास आपण साथीला अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकू. म्हणून साथीचा वेग कमी करूया आणि वाढत्या रुग्णसंख्येला न घाबरता चांगल्या पद्धतीने सामना करूया.
४) कोरोना चाचण्यांबाबत काय सांगाल?
-कोरोनाच्या चाचण्याबद्दल काही बाबी जाणून घेऊ. आपल्याला कोरोना तर झालेला नाही ना या भीतीने अनेक नागरिकांना असे वाटत आहे की आपण आपली चाचणी करून घ्यावी आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी टेस्ट करून घेण्याचा काहीही उपयोग नाही. कोरोनाचे निदान करण्यासाठी दोन पद्धतीच्या चाचण्या केल्या जातात. पहिली म्हणजे घशातील स्त्रावाची तपासणी. ही चाचणी अत्यंत महाग आहे. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे या चाचणीचा दर चार हजार ते साडेचार हजार रुपये आहे. खाजगी प्रयोगशाळांमध्ये यापेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. आपल्याला लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय आला असेल तरच डॉक्टर चाचणी करून घेण्याबाबत सल्ला देतात. आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी किंवा पैसे आहेत म्हणून चाचणी करुन घेण्याचा काहीही उपयोग नाही.
दुस?्या प्रकारची चाचणी म्हणजे रक्ताची तपासणी. ती चाचणी सध्या स्वस्त आहे आणि नवीन आहे. या चाचणीचे रिझल्ट कशा पद्धतीचे आहेत, याबाबत अद्याप अभ्यास सुरू आहे. काही त्रुटी आढळून आल्याने सध्या या पद्धतीचा करू नका असे आयसीएमआरने सुचवले आहे. समाजातील किती लोकांना लागण झाली आहे, याची प्राथमिक चाचणी करण्यासाठी अशा पद्धतीची तपासणी गरजेची आहे. मात्र किती लोकांची चाचणी करायची याबाबत शासकीय यंत्रणांकडून निर्णय घेतला जात आहे. चाचण्यांमध्ये अधिक संशोधन झाल्यास, त्यामध्ये सुधारणा झाल्यास पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आपल्या रक्तामध्ये एखाद्या आजाराविरोधात काही अँटीबॉडीज निर्माण होत असतात. म्हणजेच आपल्या रक्तामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे की नाही हे या चाचणीवरून ठरवता येते, असे संशोधनातून सिद्ध झाल्यास त्यांचे प्रमाण वाढवले जाऊ शकते. हे सर्व होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.