Corona virus : पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात कर्मचाऱ्यांअभावी ऑक्सिजन बेड्स धूळखात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 12:43 PM2020-09-05T12:43:35+5:302020-09-05T12:43:55+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही पालिकेला आपल्या रुग्णालयांसाठी डॉक्टर, परिचारिका उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त

Corona virus : No use of Oxygen beds in Pune Municipal Corporation's Dalvi Hospital due to lack of staff | Corona virus : पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात कर्मचाऱ्यांअभावी ऑक्सिजन बेड्स धूळखात 

Corona virus : पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात कर्मचाऱ्यांअभावी ऑक्सिजन बेड्स धूळखात 

Next
ठळक मुद्देदळवी रुग्णालय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

राजानंद मोरे-
पुणे : ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील ६० हून अधिक ऑक्सिजन बेड कर्मचाऱ्यांअभावी धूळखात पडून आहेत. घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही पालिकेला आपल्या रुग्णालयांसाठी डॉक्टर, परिचारिका उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, अ‍ॅक्टिव रुग्ण त्याप्रमाणात वाढत नाहीत. तसेच अनेक रुग्ण घरी विलगीकरणात राहण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी पालिकेची कोविड सेंटरवरील ताण कमी झाला आहे. पालिकेने ८ ते १० सेंटर रुग्णांअभावी बंदही केले आहेत. असे असतानाही डॉक्टर, परिचारिकांचा तुडवडा भासत असल्याचे चित्र आहे. नायडू रुग्णालयासह महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याच्या तेथील डॉक्टरांच्या तक्रारी आहेत.
महापालिकेच्या दळवी रुग्णालयामध्ये ‘क्रेडाई’ या संस्थेने सामाजिक दायित्वातून सुमारे १८० ऑक्सिजन बेड व्यवस्था केली आहे. त्यामध्ये १० आयसीयु बेड आहेत. त्यासाठी लिक्विड आॅक्सिजन टँकची उभारणीही करण्यात आली आहे. एक-दीड महिन्यापुर्वी हे रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी सुरू करण्यात आले. मात्र, सध्या या रुग्णालयात केवळ ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये ३० ऑक्सिजन बेडवर तर १० रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. आॅक्सिजनची गरज नसलेले रुग्णही रुग्णालयात दाखल केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णालयातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी ५० अशा एकुण १०० बेड तयार आहेत. तसेच पहिल्या मजल्यावरही काही बेड सुसज्ज करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर १० आयसीयु आहेत. त्यामुळे ६० हून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. कर्मचारी नसल्याने रुग्ण घेत नसल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
-----------------
महापालिकेची बंद रुग्णालये सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पण सध्या सुरू असलेल्या रुग्णालयांमध्येच परिचारिका व डॉक्टर उपलब्ध करून देणे महापालिकेला शक्य होत नाही. तर दुसरीकडे जम्बो रुग्णालय व्यवस्थापनाकडून काही दिवसांत ३०० बेडसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे.

Web Title: Corona virus : No use of Oxygen beds in Pune Municipal Corporation's Dalvi Hospital due to lack of staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.