Corona virus : खेड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहचली ८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 06:13 PM2020-05-25T18:13:36+5:302020-05-25T18:13:51+5:30
मुंबई - पुणे येथून चौथ्या लॉकडाऊनच्या काळात हजारो नागरिक खेड तालुक्यात आपापल्या गावी आले आहेत.
राजगुरूनगर: वडगाव पाटोळे (ता.) खेड येथे मुंबईवरून गावी आलेल्या एका वृद्धाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.खेड तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८ वर जाऊन पोहचली आहे.कडुस, वडगाव पाटोळे येथे मुंबईवरुन आलेले दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांना तपासणीसाठी पाठविले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले. त्यामुळे खेड तालुक्यात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या वडगाव पाटोळे येथे ५८ वर्षीय व्यक्ती मुंबई वरून पाच दिवसांपूर्वी गावाला आला होता. त्याला लक्षणे दिसल्याने त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. तसेच कडूस (ता. खेड ) येथे मुंबईवरून आला होता. काही दिवस येथे राहिल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे दिसताच तो एक व्यक्ती पुन्हा मुंबईला परत गेला. व पॉझिटिव्ह निघाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या ६ व्यक्तीना तपासणी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.
मुंबई - पुणे येथून चौथ्या लॉकडाऊनच्या काळात हजारो नागरिक तालुक्यात आपापल्या गावी आले आहेत. रेडझोन मधून आलेल्या सुमारे १४०० लोकांना त्यांच्या गावांमध्ये क्वारंटाईन केले आहे. तर अनेक गावात आलेले मुंबई पुणेकर गावात खुले आम फिरत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान राजगुरूनगर परिसरात दोन व्यक्ती संशयित असून त्यांचे स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे.कडूस येथे मुंबईवरून आलेल्या एक व्यक्ती पुन्हा मुंबईला परत गेल्यानंतर तिथे पॉझिटिव्ह आला असल्याने कडसूमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्या ६ व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. गाढवे यांनी सांगितले.