Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १६ हजारांच्या घरात; आतापर्यंत ६०४ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:13 PM2020-06-23T12:13:34+5:302020-06-23T12:17:14+5:30
पुणे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत ३५२ नवीन रुग्ण वाढ
पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवार (दि.२२) रोजी एका दिवसांत ३५२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ हजार ३१ झाली असून, एकूण मृत्यू ६०४ वर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये सुट दिल्यानंतर रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरीभागासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत. यात कन्टमेन्ट झोन बाहेर रूग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहेत. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागरिकांकडून सुरक्षित सामाजिक अंतर ठेवले जात नाही किंवा मास्कचा वापर केला जात नाही यामुळे रुग्ण वाढतच आहेत.
-----
शहरात दिवसभरात २१२ रूग्णांची वाढ
पुणे : शहरात दिवसभरात २१२ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १२ हजार ६८६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. विविध रुग्णालयातील २८० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण ४ हजार ४९६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २१२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १५९ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २८० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात सोमवारी ०८ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५१८ झाली आहे. दिवसभरात एकूण २५५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १९५ रुग्ण, ससूनमधील १३ तर खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ४९६ झाली आहे
एकूण बाधित रूग्ण : १६०३१
पुणे शहर : १२३५७
पिंपरी चिंचवड : १६३२
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १३०५
मृत्यु : ६०४