Corona virus : पुणे शहरातील रुग्णांचा आकडा अडीच हजारांच्या पार; दिवसभर पाच रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:18 PM2020-05-12T12:18:17+5:302020-05-12T12:18:55+5:30
दिवसभरात तब्बल ६९ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत.
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये शनिवारी दिवसभरात ९१ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ५७३ झाली आहे. यासोबतच दिवसभरात तब्बल ६९ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ९६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०२, नायडू रुग्णालयात ७५ तर खासगी रुग्णालयांमध्ये १४ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ७९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात सोमवारी पाच मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४९ झाली आहे. दिवसभरात एकूण ६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ४२ रुग्ण, ससूनमधील १२ तर खासगी रुग्णालयांमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १०८९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३३५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २३ हजार ७५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९३५, ससून रुग्णालयात १०४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २९६ रुग्ण उपचार घेत आहेत.