Corona virus : कोरोनाच्या बंदोबस्तातील 'टेन्शन' दूर करण्यासाठी पोलिसांना ऑनलाइन मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:17 PM2020-05-07T12:17:27+5:302020-05-07T12:19:29+5:30
बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना ताण, भीती, नैराश्य पोलिसांना जाणवत आहे.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड महिन्यापासून बंदोबस्तासाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून पोलिसांच्या मनातील शंका, समस्यांचे निराकरण केले आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिसांना ऑनलाइन पद्धतीने ध्वनिचित्रफितीद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.
आतापर्यंत दहा विषयांवरील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात भावनिक प्रज्ञावंत वर्ग उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण पूर्वीपासून देण्यात येत असले तरी पोलीस दलाचा गाडा हाकणाऱ्या पोलीस शिपायांना या मार्गदर्शन वर्गाचा लाभ मिळावा म्हणून गेल्या चार वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांबरोबर कसे वागावे, त्यांच्या समस्या काय आहेत तसेच पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यापासून शहरातील पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भावनिक प्रज्ञावंत वर्गाचे नियमित केले जाणारे आयोजन काहीसे लांबले होते. पोलीस आयुक्तालयात दररोज शंभर पोलिसांच्या गटाला मार्गदर्शन करण्यात येते.
बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना ताण, भीती, नैराश्य पोलिसांना जाणवत आहे. स्वत: भावनिक प्रज्ञावंत अभ्यासक्रम पूर्ण केला असून ज्ञान वाढविण्यासाठी विविध विषयांवरील पुस्तके वाचली. पोलिसांना जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी टाळेबंदीत पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली खास ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे. पोलिसांच्या भावना समाजावून घेणे, त्यांना सामाजिक अंतर पाळण्यास सांगणे, स्वच्छता, स्वत:ची आणि कु टुंबियांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, असे या वर्गाचे संयोजक तानाजी सरडे यांनी सांगितले.
एकाच वेळी शंभर पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तालयात जमू शकत नसल्याने पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली टाळेबंदीत असलेल्या पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी खास ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे. वीस मिनिटांची ध्वनिचित्रफीत असून समाजमाध्यमातून ही ध्वनिचित्रफीत शहरातील प्रत्येक पोलिसाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल पवार, पोलीस नाईक तानाजी सरडे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर दुसंगे यांनी ध्वनिचित्रफीत तयार केली आहे.