Corona virus : पुण्यातील दुकानांसाठीची पी -१, पी -२ पध्दत रद्द; दुकाने सर्व दिवस सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:32 PM2020-08-04T18:32:03+5:302020-08-04T18:32:34+5:30
दुकानांबाबतची नवीन नियमावली उशिरा जाहीर करण्यात येणार
पुणे : लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील दुकाने उघडी ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली पी-१, पी-२ ही पध्दत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आता आठवड्यातील सर्व दिवस दुकाने सुरू ठेवता येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे तीन महिने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यानंतर अनलॉक -१ मध्ये दुकाने उघडण्यात आली. मात्र, रस्त्याच्या एका बाजुची दुकाने एका दिवशी आणि दुसऱ्या बाजुची दुसऱ्या अशी सम-विषम (पी-१-पी-२)पध्दत अवलंबण्यात येत होती. त्यामुळे व्यावसायिकांना सर्व दिवस दुकाने उघडी ठेवता येत नव्हती. याबाबत पुणे व्यापारी महासंघातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती.
राज्य सरकारचेच आदेश असल्याने पुणे प्रशासन याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे व्यापाऱ्यांना सांगण्यात येत होते. मात्र, सोमवारी मुंबई महापालिकेने पी-१,पी-२ पध्दत रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पुण्यातही निर्णय घेतला आहे. याबाबतची नियमावली महापालिकेकडून रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे. त्यांची उपसचिव या पदावर चार वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारनेच हे आदेश काढले असून तीन आठवड्याच्या आत त्यांना कार्यमुक्त करावे, अशा सूचना केल्या आहेत. राम हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यात चांगली कामगिरी बजावली होती. राम यांच्या जागी जिल्हाधिकारीपदी कोण येणार याबाबत उत्सुकता आहे. राज्य सरकारकडून लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत.