Corona virus : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना पुणे विमानतळावरच करता येणार कोविड चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:11 PM2020-10-16T12:11:20+5:302020-10-16T12:15:34+5:30
चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निगेटिव्ह असल्यास प्रवाशांना घरी पाठविले जाणार आहे.
पुणे : परदेशातून थेट पुण्यात येणाऱ्या विमान प्रवाशांना आता पुणे विमानतळावरच कोविड चाचणी करता येणार आहे. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निगेटिव्ह असल्यास प्रवाशांना घरी पाठविले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता संपुर्ण विलगीकरणाचा काळ हॉटेलमध्ये घालवावा लागणार नाही.
कोविड प्रोटोकॉलनुसार, परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना सात दिवस जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या संस्थात्मक विलगीकरणात किंवा हॉटेलमध्ये राहावे लागते. त्यानंतर पुढील सात दिवस घरी विलगीकरण बंधनकारक आहे. यातून गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहाने मुले व आजारी व्यक्तींना वगळण्यात आले आहे. त्यांना घरी विलगीकरणात ठेवले जाते. आता विमानतळावरच चाचणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या घशातील स्त्रावाचे नमुने विमानतळावर संकलित केले जातील. या चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागणार आहे.
चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणातून सुट दिली जाणार आहे. पण पुढील सात दिवस घरी राहावे लागेल. जिल्हा प्रशासनाकडून ‘आरटी-पीसीआर निगेटिव्ह’ असा श्क्किा हातावर मारला जाईल. तर पॉझिटिव्ह येणाºया प्रवाशांना रुग्णालयात पाठविले जाणार आहे. चाचणीची ही सुविधा प्रवाशांना बंधनकारक नाही.
---------
विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सुविधेसाठी चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, हे बंधनकारक नाही. संस्थात्मक विलगीकरण टाळायचे असल्यास या सुविधेचा फायदा घेता येईल.
- कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ
-----------
चाचणीसाठी या मेलवर नोंदणी करता येईल. तसेच पुणे विमानतळाचे टिष्ट्वटर किंवा विमानतळावरील मदत कक्षातून माहिती मिळु शकेल.
----------