Corona virus :शहरातील लोक परतल्याने गावांवरही ‘कोरोना’चे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:30 PM2020-03-23T22:30:00+5:302020-03-23T22:30:02+5:30

शहरांमधून आलेल्या नागरिकांना तपासण्यासाठी गावांमध्ये कोणत्याही स्वरुपाची यंत्रणा सध्या दिसत नाही.

Corona virus : As the people return to the city, the corona shadows over the villages | Corona virus :शहरातील लोक परतल्याने गावांवरही ‘कोरोना’चे सावट

Corona virus :शहरातील लोक परतल्याने गावांवरही ‘कोरोना’चे सावट

Next
ठळक मुद्देमुंबई-पुण्यातील लोकांचे गावाकडे लोंढे सुरूच बारामतीसह भोर, वेल्हा, मुळशी, दौंड, इंदापूर भागातील लोक पुण्यामध्ये काम करतात.

पुणे : मुंबई-पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ‘शटडाऊन’चे संकेतदेखील दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कामानिमित्त, नोकऱ्यांसाठी मुंबई, पुण्यामध्ये वास्तव्यास असलेले नागरिक भीतीने आपापल्या गावाकडे परतत आहेत. गेल्या एक-दोन दिवसांत गावा-गावात शेकडो नागरिक परत आले आहेत. शहरी भागांसारखी आरोग्य व्यवस्था गावांमध्ये नसल्याने व पुणे-मुंबईमधून आलेल्या या नागरिकांमुळे सध्या शहरासोबत ग्रामीण भागामध्ये गावा-गावांमध्ये ‘कोरोना’चे मोठे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांमधून आलेल्या नागरिकांना तपासण्यासाठी गावांमध्ये कोणत्याही स्वरुपाची यंत्रणा सध्या दिसत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. 
पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील घरटी लोक विविध कामधंद्यासाठीअथवा नोकरीसाठी मुंबईमध्ये आहेत. बारामतीसह भोर, वेल्हा, मुळशी, दौंड, इंदापूर भागातील लोक पुण्यामध्ये काम करतात. पुणे शहरामध्ये ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल २८ वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संख्या तब्बल ३८ वर गेली आहे. यामुळे पुणे, मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईमध्ये संबंधित प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच कोरोनाच्या धास्तीने शहरामध्ये राहणारे बहुतेक नागरिक आपल्या गावांकडे परत जात आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शहरामधून आलेल्या नागरिकांची जत्रा-यात्रांसारखी गर्दी होऊ लागली आहे. 
आंबोली गावालगतच्या आठ-दहा गावांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आंबोलीसह लगतच्या गावांमध्ये किमान ७००-८०० पुणे-मुंबईमधील नागरिक आले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागातील गावांवरही ‘कोरोना’चे सावट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात बहुतेक तालुक्यांमध्ये आठ-दहा गावे मिळून एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यातही दुर्गम तालुक्यांमध्ये १०-२० मैल गावांमध्ये साधे मेडिकलदेखील नाही. गावातील लोक आजारी पडल्यास थेट तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. सध्या पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थितीदेखील बिकट आहे. खेड तालुक्यातील दुर्गम भागातील आंबोली ग्रामपंचायतींच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच परिचारिका कार्यरत असून, साध्या सर्दी, खोकल्याचीदेखील पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत.
--------------------
प्रत्येक गावांमध्ये तपासणी सुरू करणार
पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध शहरांमधून नागरिक आपल्या गावांकडे परत आले आहेत. शहरी भागातून गावांमध्ये आलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. यामुळे येत्या एक-दोन दिवसांत प्रत्येक गावांमध्ये तपासणी सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा सर्व गावांची तपासणी करण्यात येईल. 
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

Web Title: Corona virus : As the people return to the city, the corona shadows over the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.