Corona virus : 'तक्रारींचा पाऊस'अनुभवलेले जम्बो हॉस्पिटलचं चित्र बदलतेय; महापौरांकडून प्रत्यक्ष पाहणी व रुग्णांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:48 PM2020-09-09T13:48:10+5:302020-09-09T13:53:58+5:30
क्षमता पाहूनच पालिकेकडून टाकली जात आहेत पाऊले , लवकरच आणखी १०० बेड सुरू
पुणे : पुण्यातील जम्बो हॉस्पिटल म्हणजे असुविधांचे भांडार, अपुरी वैद्यकीय उपचार यंत्रणा, रुग्णांची हेळसांड यांसारख्या अनेक तक्रारी समोर आल्याने प्रतिमा झालेले हे हॉस्पिटल आता नवी कात टाकू लागले आहे. तक्रारींचा पाऊस अनुभवलेल्या जम्बो चे रुपडे पालटू लागले आहे. हळूहळू येथील आरोग्य यंत्रणा सक्षम होतेय तसेच आता इथून रुग्ण बरे होऊन घरी जाण्यास देखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महापालिकेने उभे केलेल्या जम्बो हॉस्पिटलबद्दल आता आशादायी व सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
पुणे महापालिकेने जम्बो हॉस्पिटलकडे विशेष लक्ष देऊन, आपल्या क्षमतेप्रमाणेच येथे रूग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे. येत्या दोन दिवसात येथे आणखी १०० ऑक्सिजन बेड व ६० आयसीयू बेड पूर्णपणे कार्यरत होणार असून, यात ३० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध राहणार आहेत, अशी माहिती रुबल अगरवाल व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीपीई किट घालून जम्बो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत तेथील आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय उपचार पद्धती,रुग्णांची परिस्थिती पाहणी केली. तसेच यादरम्यान स्वतः २० रूग्णांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली.तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना देखील यावेळी महापौरांनी दिल्या.
सद्यस्थितीला १७८ कोविड-१९ चे रूग्ण उपचार घेत असून, यापैकी ३८ जण आयसीयूमध्ये तर ११ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जम्बो हॉस्पिटलच्या व्यवस्थापनची जबाबदारी असलेल्या लाईफ लाईन एजन्सीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असताना, त्याचवेळी महापालिकेने विविध एजन्सींच्या माध्यमातून ५९ डॉक्टर व १४० पॅरामेडिकल स्टाफ येथे उपलब्ध करून देऊन रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याची व्यवस्था केली आहे.
जम्बो हॉस्पिटलमधील उपलब्ध डॉक्टर व अन्य वैद्यकीय सेवक वर्ग लक्षात घेता, येथे आणखी नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी हॉस्पिटलमध्ये नवीन रूग्ण दाखल करून घेतला जाणार नाही.दरम्यान हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कधी चालू होईल याची निश्चित तारीख रविवारी जाहिर करू असेही महापालिकेने सांगितले आहे.
जम्बो हॉस्पिटलमध्ये जे रूग्ण सध्या उपचार घेत आहेत, त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रकारची औषधे ही महापालिकाच पुरविणार असून, हॉस्पिटलमध्ये २ कोटींची औषधे पूर्वीपासूनच पुरविण्यात आल्याचे अगरवाल यांनी सांगितले. तर नव्याने रूग्ण दाखल प्रक्रिया सुरू केल्यावर त्यांना आवश्यक औषधे कशारितीने द्यावयाची याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाच्या आदेशानुसार घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
----------
जम्बो हॉस्पिटलमधून १७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
जम्बो हॉस्पिटलमधून रविवारपासून रूग्ण घरी परतू लागले असून, मंगळवारी रात्रीपर्यंत १७ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. महापालिकेने व्हिडिओ कॉन्स्फरंसिंगच्या माध्यमातून रूग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली असून, आज महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल हे स्वत: पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये गेले व त्यांनी २० रूग्णांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली.
-----------------