Corona virus :'एबी' रक्तगटाचा प्लाझ्मा इतर रक्तगटांच्या कोरोनारूग्णांना देणे शक्य; पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:29 PM2020-08-14T15:29:07+5:302020-08-14T15:34:58+5:30
प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
तेजस टवलारकर
पिंपरी : एखाद्या कोरोनाच्या रूग्णाला प्लाझ्माची गरज असेल आणि त्याला त्याच्या रक्तगटाचा प्लाझ्मा उपलब्ध होत नसेल तर अशावेळी त्या रूग्णाला एबी रक्तटाचा प्लाझ्मा दिला जाऊ शकतो. एबी पॉझिटिव्ह किंवा एबी निगेटीव्ह या दोन्हीपैकी एका रक्तगटाचा प्लाझ्मा अशा वेळी दिला जाऊ शकतो. यातून रूग्णाला कुठलाही त्रास होत नाही. परंतु हे करताना रूग्णावर उपचार करणारा डॉक्टर आणि रक्तपेढीतीलडॉक्टर यांची सल्लामसलत होणे गरजेचे असते. अशी माहिती वायसीएम रक्तपेढीचे प्रमुख डॉ. तुषार पाटील यांनी दिली.
प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र प्लाझ्मा बॅग्जची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
इतर वेळी एखाद्या रूग्णाला त्याचा रक्तगट मिळत नसेल तर त्या रूग्णाला ओ या रक्तगटाचा प्लाझ्मा देण्यात हरकत नसते. देण्याअगोदर हिमोलायसिन टेस्ट करणं आवश्यक आहे. या टेस्ट मुळे ओ रक्त गटाचा प्लाझ्मा रूग्णाकरिता धोकादायक आहे किंवा नाही हे समजते. प्लाझ्मा थेरपीमध्ये पाहिजे तो रक्तगट मिळत नसल्यास एबी या रक्तगटाला प्राधान्य दिले जाते. परंतु हा निर्णय उपचार करणारे डॉक्टरच घेऊ शकतात. प्लाझ्मा थेरपी ही उपचार पध्दत वापरतांना सध्या ज्या रक्तगटला जो रक्तगट लागू होतो त्याच रक्तगटाचा प्लाझ्मा दिला आहे. प्लाझ्मा थेरपी ही उपचार पध्दती कोणत्या रूग्णांवर करायची याचा निर्णय हा डॉक्टर घेत आहेत. ज्या रूग्णाला इतर औषधांना प्रतिसाद देत नाहीत आणि ऑक्सिजनची गरज अधिक आहे अशा रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी ही उपचार पध्दत वापरली जात आहे.
भारतामध्ये 'बी' रक्तगट हा सर्वाधिक लोकांमध्ये असतो. त्यामुळे याच रक्तगटाची मागणी सर्वाधिक असते. प्लाझ्मा थेरपी विषयी सध्या मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेले रूग्ण प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहेत. एकदा प्लाझ्मा दान केल्यावर १५ दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा दान करता येऊ शकतो.