Corona virus : पोलिसांची 'हुशारी' : मास्क कारवाई ८ ऑक्टोबरची आणि पावती ११ ऑक्टोबरची
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 10:57 PM2020-10-10T22:57:03+5:302020-10-10T23:37:05+5:30
पुढील दिवसांचे 'टार्गेट' आधीच पूर्ण करण्यासाठी लढविली शक्कल
पुणे : सध्या कोरोनामुळे शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर मास्कची कारवाई सुरू आहे. राज्यामध्ये सर्वाधिक महसूल पुण्याने या कारवाईद्वारे दिला आहे. आतापर्यंत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा दंड या कारवाईमधून वसूल करण्यात आला आहे. परंतु, हेच टार्गेट पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढील दिवसांच्या तारखा टाकून पावत्या देऊ लागल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात नागरिकाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे 'लोकमत'ला सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ४२ वर्षीय व्यक्ती खाजगी कार्यालय मध्ये नोकरी करते. ते कामानिमित्त हडपसरकडून कोंढव्याला जात होते. हडपसर आकाशवाणी येथे त्यांना पोलिसांनी अडवले. त्यांनी मास्क परिधान केलेला होता. परंतु, हा मास्क नाकावरून खाली घसरल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. मी व्यवस्थित मास्क घातलेला आहे असे सांगूनही पोलिसांनी तुम्ही आम्हाला पाहून मास्क वर घेतला असे कारण देत त्यांची पाचशे रुपयांची दंडाची पावती केली.
पोलिसांनी दिलेल्या पावतीवर ८ तारीख टाकली जाणे अपेक्षित होते. परंतु, पावतीवर ११ ऑक्टोबर अशी तारीख लिहिण्यात आलेली होती. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता पावतीवर ११ ऑक्टोबरची तारीख असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी 'दादा' ग्रुपचे कार्यकर्ते बाळासाहेब अटल यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घडलेला प्रकार कथन केला. अटल यांनी 'लोकमत'शी संपर्क साधून हा प्रकार निदर्शनास आणून दिला.
कारवाई ८ ऑक्टोबरला म्हणजे गुरुवारी करण्यात आलेली आहे. परंतु, पावती मात्र ११ ऑक्टोबर म्हणजेच रविवारची देण्यात आलेली आहे. केलेल्या कारवाईची पावती तीन दिवसांनंतरच्या तारखेने देऊन पोलीस पुढील दिवसांचे 'टार्गेट' आधीच पूर्ण करून घेत असल्याचे दिसत आहे. रविवारी बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असते. नागरिकांनाही सुट्टी असते. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी असते. त्या दिवशीच्या 'टार्गेट'चा 'बॅकलॉग' भरून काढण्यासाठी पोलिसांनी लढवलेली ही शक्कल उजेडात आली आहे. अशा प्रकारच्या कारवाया शहरात अन्य ठिकाणी सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलिसांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली जात आहे.