Corona Virus : पुण्याचे कारभारी कोरोना उपचारासाठी 'खासगी' त अन् नागरिक कुठे म्हणे 'सरकारी'त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 06:51 PM2020-08-10T18:51:41+5:302020-08-10T19:06:31+5:30
पालिकेच्या आरोग्य सुविधांवर नागरिकांचा कसा वाढणार विश्वास
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर्स उभे करून तेथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत. एकीकडे पालिकेच्या रुग्णालयात चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी दुसरीकडे मात्र पदाधिकारी-अधिकारी आणि नगरसेवक मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचा शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास वाढणार कसा असा प्रश्न आहे.
कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्यापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिकांचा कल अधिक आहे. पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांवरून अनेकदा प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला आहे. नागरिकांकडून अनेकदा याबाबत प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनावर आजवर अडीचशे ते तीनशे कोटींच्या घरात खर्च झाल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे. या खर्चाचा तपशील मात्र आद्यप मिळू शकलेला नाही. असे असतानाही उपचरांकरिता पालिकेच्या दवाखान्यात न जाता नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावेसे वाटतात.
बहुतांश नागरिक खासगी रुग्णालयात खाटा मिळत नाहीत अशी ओरड करीत आहेत. नाईलाजस्तव शेवटचा पर्याय म्हणून पालिकेच्या कोविड केअर सेंटर्सकडे पाहिले जाते. पालिकेने काही खासगी रुग्णालयांशी करार केला असून तेथे नागरिकांवर उपचार करण्याकरिता सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. एकंदरीतच पालिका सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधून कोरोनाची भीती वळविण्यात आणि सर्वसामान्यांच्या मनात शासकीय आरोग्य सुविधांबाबत विश्वास निर्माण करण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे.
-------
कोरोना बाधित झालेल्या महापौर, विरोधी पक्षनेत्या यांच्यासह जवळपास आठ ते दहा नगरसेवकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. यासोबतच काही पदाधिकाऱ्यांचे अत्यंत निकटचे नातेवाईकही खासगी रुग्णालयातूनच उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर, पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांनीही खासगी रुग्णालयातील उपचार घेतले. एकीकडे पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. तर, दुसरीकडे पालिकेतील प्रमुख घटक मात्र खासगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. त्यांनी कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, यामुळे पालिकेच्या वैद्यकीय सुविधेवर त्यांचाच विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.