Corona virus positive news : दिलासादायक! पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार ६१९ रुग्ण झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:05 PM2020-06-15T12:05:01+5:302020-06-15T12:05:54+5:30
पुणे जिल्ह्यात रविवारी एका दिवसांत ३६५ नवीन कोरोना बाधित
पुणे : पुणे जिल्ह्यात रविवार (दि.14) रोजी एका दिवसांत तब्बल ३६५ नवीन रुग्णांची भर पडली. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ११ हजार ९२५ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून, आता पर्यंत ७ हजार ६१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण मृत्यू ४९८ एवढे झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या सध्या सर्वांचाच चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण मात्र कमी असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. जिल्ह्यात रविवारी एका दिवसांत 365 नवीन रुग्ण वाढले तर १६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान गेल्या दोन-चार दिवसांत तपासणीचे प्रमाण कमी असताना रूग्ण संख्येचा अंक मात्र मोठे आहेत. ही बाबा सर्वांसाठीच धोक्याचा इशारा असू शकते.
पुणे शहरात रविवारी ३२० रूग्णांची वाढ : १२३ जण कोरोनामुक्त
पुणे : पुणे शहरात रविवारी ३२० कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आत्तापर्यंत ९ हजार ५५६ इतकी झाली आहे़ यापैकी ६ हजार २१० रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून, यातील १२३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये २०३ रूग्ण गंभीर असून, ४५ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत़ तर आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये ससूनमधील ४ तर खाजगी हॉस्पिटलमधील ५ जणांचा समावेश आहे़
रविवारी वाढ झालेल्या ३२० कोरोनाबाधितांपैकी २६१ जण पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व आयसोलेशन सेंटरमध्ये तर ससूनमध्ये ७ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ५२ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत़ आज कोरोनामुक्त झालेल्या १२३ जणांपैकी ९० जण हे विविध आयासोलेशन सेंटरमधील असून, खाजगी हॉस्पिटलमधील २४ जण तर ससून हॉस्पिटलमधील ९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़
पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ५५६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे़
आज दिवसभरात २२३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, आत्तापर्यंत पुणे महापालिका हद्दतील ७१ हजार ४२५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत़ प्रयोगशाळेकडून अद्याप १ हजार १३२ जणांचे तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहेत़
दरम्यान पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा साडेनऊ हजाराच्या पुढे गेला असला तरी, शहरातील अ?ॅक्टिव (उपचार घेत असलेले कोरोनाबाधित) रूग्ण संख्या २ हजार ९९८ इतकीच आहे़
--------------------------
एकूण बाधित रूग्ण : ११,९२५
पुणे शहर : ९७६४
पिंपरी चिंचवड : ११४५
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १०१६
मृत्यु : ४९८
बरे झालेले रुग्ण : ७६१९