corona virus :आशादायी आणि सुखकर ;राज्यातला पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्याच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:39 AM2020-03-24T10:39:36+5:302020-03-24T10:53:26+5:30
संपूर्णतः दुष्काळ असताना एखादा पाण्याचा ढगही सुखकर दिलासा देतो त्याप्रमाणे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुण्यातला पहिले दोनही रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यातली ही घटना म्हणजे आशादायी चित्र मानायला हवे.
पुणे ; संपूर्णतः दुष्काळ असताना एखादा पाण्याचा ढगही सुखकर दिलासा देतो त्याप्रमाणे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुण्यातला पहिले दोनही रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यातली ही घटना म्हणजे आशादायी चित्र मानायला हवे.
अधिक माहिती अशी की, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०१ आहे. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे. इतकेच नव्हे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व नागरी व्यवहार मंदावले असून केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. तसेच जिल्हा अंतर्गत सीमाही बंद करण्यात आल्या असून लोकांना जास्तीत जास्त घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आयोजित एकदिवसीय जनता कर्फ्यू वगळल्यास नागरिकांनी पुन्हा घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अखेर कलम १४४नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातही काहीशी अशीच स्थिती असून आपत्कालीन सेवा वगळता पीएमपी बस सेवा ,सर्व बाजारपेठा, दुकाने, सेवा बंद आहेत.
दुसरीकडे नायडू रुग्णालयात दाखल असलेल्या पहिल्या दोन रुग्णांचा १४ दिवसानंतरचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आज त्यांची दुसरी चाचणी होणार असून तोही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. अर्थात त्यांना पुढे काही दिवस घरीच राहावे लागणार आहे. मात्र ते दोघे घरी गेल्यास कोरोनाचे रुग्ण बरे होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दरम्यान हे रुग्ण पती-पत्नी असून ४० जणांच्या ग्रुपसोबत खासगी ट्रॅव्हल कंपनीने दुबईस गेले होते.