corona virus ; माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा ; पुण्यात रिक्षाचालकांची नायडू कर्मचाऱ्यांना मोफत सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:06 PM2020-03-24T13:06:17+5:302020-03-24T13:24:37+5:30
नायडू रुग्णालयात कामासाठी जाणाऱ्या सर्वांना ही सेवा मोफत उपलब्ध असून त्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.
पुणे : शहरात संचारबंदी लागू असताना सर्व वाहतूक बंद झाली आहे. अशावेळी आपत्कालीन सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस यांना पुण्यातील छावा संघटनेतर्फे सोडण्यात येत आहे. नायडू रुग्णालयात कामासाठी जाणाऱ्या सर्वांना ही सेवा मोफत उपलब्ध असून त्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. जर आपत्कालीन सेवा देणाऱ्या व्यक्तींना रुग्णालयात वेळेवर पोहोचता आले नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते हाच विचार करून ही सेवा सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातला कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात सापडला. आत्ताच्या घडीला पुण्यात २० तर पिंपरीत १२ कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र पहिल्या रुग्णाला मुंबई-पुणे टॅक्सी सेवा देणाऱ्या चालकालाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे घाबरलेल्या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांनी नायडू रुग्णालय आणि त्याशी संबंधित व्यक्तींना सेवा देणे बंद केले. त्यातच आता पीएमपी बस बंद आहेत. रविवारी जनता कर्फ्यू पाळला गेला. त्यावेळी आरोग्य सेवा देणाऱ्यांना उशीर होऊ नये म्हणून छावा संघटना पुढे आली असून त्यांनी यासाठी तीन रिक्षांची सेवा सुरु केली आहे. त्यांना जर नायडू रुग्णालयात जायचे असल्याचा फोन केला तर ते तात्काळ सेवा पुरवतात.
याबाबत नायडूत सेवा देणाऱ्या डॉ प्रवीण चौधरी यांनाही अनुभव आला आहे. चौधरी यांची गाडी अचानक नादुरुस्त झाल्याने आता सेवा द्यायला कसे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर लोकमतमध्ये दिलेल्या असलेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी फोन केला आणि त्या डाँक्टरांना वेळेत नायडू रूग्णालयात पोचता आले. दुपारी आकाश कसबे या रिक्षाचालकाने त्यांना नायडू मध्ये सोडले, तर रात्री रूग्णालयातून घरी किशोर मोरे यांनी सोडले. डाँक्टरांसोबतच अनेक नर्स आणि इतरांना नायडू रूग्णालयात सोडण्याचे काम या संघटनेकडून होत आहे. आज देखील ही सेवा सुरू आहे.
कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व स्टाफची सेवा करता आली. प्रशासनाला आणि शासन यांना खारीचा वाटा म्हणून सहकार्य करू शकलो. काल रात्र पाळी केलेले नायडू हॉस्पिटल मधील कर्मचारी यांना हॉस्पिटलमध्ये वेळेत आणता आले, याचा आनंद असल्याची भावना रिक्षाचालक किशोर मोरे, विशाल टकले व आकाश कसबे यांनी व्यक्त केल्या.
नायडू हॉस्पिटल ते मोशी , चिखली , पिंपरी , काळेवाडी , आळंदी ,भोसरी , दापोडी, खराडी , मांजरी ,हडपसर , मुंढवा , स्वारगेट , कोथरूड , वारजे , गंगाधाम चौक अशा अनेक ठिकाणी ही मोफत वाहन सेवा देण्यात आली. आज देखील सुरू असल्याची माहिती संघटनेचे धनंजय जाधव यांनी 'लोकमत' ला दिली. आवश्यकता असल्यास 8983904888 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.