Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात २२७ कोरोनाबाधित रुग्ण एका दिवसांत बरे होऊन गेले घरी; नवीन ७६ रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 11:45 AM2020-06-02T11:45:19+5:302020-06-02T11:46:30+5:30
जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एकदम कमी झाली
पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि.१) रोजी २२७ कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवशी बरे होऊन घरी गेले आहेत. तर ७६ नवीन रुग्णांची भर पडली. सोमवारी ८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे ३४५ रुग्णांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एकदम कमी झाली. परंतु ही संख्या विविध तपासणी केंद्रावर अहवाल प्रलंबित असल्याने कमी दिसत आहे. सोमवारी एका दिवसांत ९२४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी केवळ २९२ रुग्णांचे अहवाल आले असून, यामध्ये ७६रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. अद्याप तब्बल ६३२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामुळे ही संख्या कमी दिसत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७ हजार ८२६ वर जाऊन पोहचली आहे. यात सर्वाधिक ६ हजार ६०१ रुग्ण एकट्या पुणे शहरामध्ये असून, पिंपरी चिंचवड मध्ये ५२६, पुणे ग्रामीण मध्ये ४११ रुग्ण सापडले आहेत.
----
एकूण बाधित रूग्ण : ७८२६
पुणे शहर : ६६०१
पिंपरी चिंचवड : ५२६
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ६९९
मृत्यु : ३४५
बरे झाले : ४७२९