Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४७२ कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; एकूण रुग्णसंख्या ११ हजार ११५
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:04 AM2020-06-19T01:04:20+5:302020-06-19T01:42:53+5:30
विविध रुग्णालयातील २४५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ हजारांच्या पार जाऊन पोचला असून गुरुवारी तब्बल ४७२ नवीन रूग्णांची भर पडली. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ११ हजार ११५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १९६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २४५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण ३ हजार ७२२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
गुरुवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ४७२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ३१४ तर खासगी रुग्णालयांमध्ये १४९ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १९६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात गुरूवारी ०६ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४८७ झाली आहे. दिवसभरात एकूण १९३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४१ रुग्ण, ससूनमधील १३ तर खासगी रुग्णालयांमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९०६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार ७२२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ४६४ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आत्तापर्यंत ८१ हजार ५११ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ६२५, ससून रुग्णालयात १२४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ९७३ रुग्ण उपचार घेत आहेत.