Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पार ; २६६ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:34 PM2021-06-30T19:34:18+5:302021-06-30T19:35:47+5:30
पुणे शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २८७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे.
पुणे : शहरात बुधवारी गेल्या काही दिवसांत प्रथमच ५०० च्यावर कोरोनाबाधित आढळून आले असून ही संख्या ५०८ इतकी आहे. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७०७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७.५७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची सरासरी टक्केवारी ५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने, लॉकडाऊनमध्ये शिथिल केलेले निर्बंध पुन्हा काही प्रमाणात वाढविण्यात आले. परंतु, जून महिन्याच्या प्रारंभी दिलेली लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढवून गेल्याचे आता काही प्रमाणात समोर येऊ लागले आहे.
दरम्यान, आज दिवसभरात २६६ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे. सध्या शहरात २ हजार ५५७ कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २८७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे.शहरात आत्तापर्यंत २६ लाख ६७ हजार ९६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७८ हजार ५१७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६७ हजार ३७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे.