Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ५३९५ तर पिंपरीत २०८६ नव्या कोरोना रूग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 09:56 PM2021-04-15T21:56:52+5:302021-04-15T21:57:03+5:30
पुणे शहरात आज दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १९ जण हे पुण्याबाहेरील आहेत
पुणे : शहरात गुरूवारी नव्याने ५ हजार ३९५ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ३२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २१ हजार ९२२ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २४.६० टक्के इतकी आहे.
दरम्यान आज दिवसभरात ६८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ४७८ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार १७२ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत १८ लाख ८० हजार ५९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ४९ हजार ४२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी २ लाख ८९ हजार १२२ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५४ हजार ३५१ इतकी आहे.
-----------------------------------
पिंपरीत चारशेंनी वाढली रुग्णसंख्या ,२०८६ जण पॉझिटिव्ह
पिंपरी : कोरोना रुग्णवाढीचा आलेख कालपेक्षा चारशेंनी वाढला आहे. २०८६ जण पॉझिटिव्ह आढळले असून २ हजार ११० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. प्रतिक्षेतील अहवालांची संख्या वाढली आहे. सहा हजार अहवाल प्रतिक्षेत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल साडेपंधरांशेवर आलेली रुग्णसंख्या आज चारशेंनी वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ८जार ५९७ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार १५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ६ हजार ५४९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ५४५ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ८ हजार ५९६ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
कोरानामुक्त वाढले
कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दीडपटीने कोरोनामुक्त झाले आहेत. २ हजार ११० जण कोरोनामुक्त एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार ७३७ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ७५ हजार ४०५ वर गेली आहे.
..................................
३६ जणांचा बळी
कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कालच्या तुलनेत एक जण अधिक आहेत. शहरातील ३६ आणि शहराबाहेरील २५ अशा एकूण ६१ जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार २८५ वर पोहोचली आहे.
..............
लसीकरण घटले
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वाढलेला वेग कमी झाला आहे. महापालिकेच्या ५९ आणि खासगी २८ अशा एकुण ८७ लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिकेतील केंद्रावर ५ हजार १५९ तर खासगी रुग्णालयात ११०२ अशा एकूण ६ हजार २६१ जणांचे लसीकरण करण्यात आले तर ४५ वर्षांवरील ५ हजार ७१२ जणांना लस देण्यात आली आहे.