Corona Virus Pune : 'होम क्वारन्टाइन' रुग्ण घटले, गंभीर रुग्ण १० हजारांच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 09:17 PM2021-05-14T21:17:32+5:302021-05-14T21:19:09+5:30
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चाललेला असताना सक्रिय रुग्णही कमी झाले आहेत. गृह विलगीकरणामध्ये असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर बरे झाले आहे. परंतु, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या मात्र, दहा हजारांच्या घरात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. मार्च आणि एप्रिल हे महिने पुणेकरांसाठी अत्यंत घातक ठरले. या काळात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुसज्जता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बेडची संख्या १४ हजारांच्या पार नेण्यात पालिका प्रशासनाला यश आले. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने प्रशासन देखील हतबल झाले होते. सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेल्यामुळे या चिंतेमुळे अधिकच भर पडली होती.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनापाठोपाठ पालिकेनेही १५ एप्रिलपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या उपाययोजनांचा परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्याही कमी होत चालली आहे.
सक्रिय रुग्णांचा आकडा खाली आला असला तरी गृह विलगीकरणामधील रुग्णांचा आकडा सर्वाधिक कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परंतु व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्ण, पालिकेचे रुग्णालय आणि केअर सेंटर मधील रुग्णालय या सर्वांची संख्या दहा हजारांच्या घरात असल्याने अजूनही गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही.
मागील महिन्यापर्यंत सक्रिय रुग्णांपैकी गृह विलगीकरणामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ६५ ते ७० टक्क्यांच्या दरम्यान होते. मात्र, ते आता ५० टक्क्यांवर आले असून ५० टक्के रुग्ण ही रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
-------
रुग्ण आकडेवारी
तारीख सक्रिय रुग्ण गृह वि. स.रुग्णालय खा. रुग्णालय कोविडसेंटर
१५ ए. ५४,३५१ ४५,४५६।२०५३। ६२२१। ६२१
६ मे ३९,५८२ २९,४४३/२२५५। ७०४३। ८४१
१२ ए. २५२२२। १४९१८। ४६२०। ३४९४। २१९०