Corona virus in pune : पुणे शहरात मंगळवारी २९३ रूग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची संख्या १० हजार १८३
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:34 PM2020-06-16T21:34:17+5:302020-06-16T21:35:33+5:30
सद्यस्थितीला २१३ कोरोनाग्रस्त गंभीर असून, यापैकी ४१ जण हे व्हेंटिलेटरवर
पुणे : पुणे शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी दहा हजाराचा आकडा पार केला. आज दिवसभरात २९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार १८३ इतकी झाली आहे. मात्र यापैकी ६ हजार ५९६ कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, यामध्ये आज कोरोनामुक्त झालेले १५० जण आहेत. दरम्यान आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू शहरात झाला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० इतका होता. आज घेण्यात आलेल्या २ हजार ५४७ स्वॅब टेस्टिंग व कालचे प्रलंबित अहवाल यापैकी आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये २९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे शहराने कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजार पार केला आहे.
सद्यस्थितीला २१३ कोरोनाग्रस्त गंभीर असून, यापैकी ४१ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी शहरात ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ५४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७६ हजार २०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार १८९, ससून रुग्णालयात १३४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ७९५ रुग्ण उपचार घेत आहेत.
------------------------