Corona virus : पुणे जम्बो कोविड सेंटर 'पहिला दिवस... पहिला रुग्ण... अर्धातास वेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 11:34 AM2020-08-27T11:34:22+5:302020-08-27T11:36:15+5:30
नियोजनाचा अभाव : ‘लाईफलाईन’चे अधिकारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जुमेनात
पुणे : कोरोना रुग्णांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मध्ये पहिल्याच दिवशी नियोजनाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला. बुधवारी या रुग्णालयात पहिला रुग्ण दाखल झाला. या रुग्णाला घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेला सूचना देण्यासाठी ना कोणी माणूस होता ना कोणती यंत्रणा. रुग्णालयातील डॉक्टर्स पीपीई कीट घालून तयार नसल्याने तब्बल अर्धा तास या रुग्णाला रुग्णवाहिकेतच बसून राहावे लागले. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही ‘लाईफलाईन’चे अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.
कोरोना रुग्णांसाठी तब्बल 800 खाटांचे सुसज्ज आणि अद्ययावत असे रुग्णालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आले आहे. तब्बल 300 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यामधून रुग्ण येणार आहेत. याठिकाणी प्रशासकीय कक्ष, रुग्ण प्रवेश कक्ष, कर्मचारी कक्ष आणि निवास उभारण्यात आलेले आहेत. या रुग्णालयामध्ये मंगळवारपासून रुग्ण दाखल होण्यास सुरुवात होणार होती. परंतू, ती झाली नाही. बुधवारपासून तरी रुग्ण याठिकाणी यावेत यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले होते. महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्यासह पालिकेचे पाच ते सहा डॉक्टर्स याठिकाणी होते. पालिकेच्यावतीने सकाळीच ‘डॅशबोर्ड’वर येथील खाटांची माहिती अपलोड करण्यात आली होती. दुपारनंतर पालिकेच्या डॉक्टरांनी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये फोन करुन रुग्णांबाबत विचारणा करुन आवश्यकतेनुसार रुग्ण जम्बो कोविड सेंटरमध्ये पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण न पाठविण्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले होते.
संध्याकाळी पाचच्या सुमारास डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची रुग्णवाहिका ज्येष्ठ नागरिक महिला रुग्णाला जम्बो कोविड रुग्णालयात घेऊन आली. त्यानंतर, या रुग्णवाहिका चालकाला नेमके कुठे जायचे हेच समजेना. याठिकाणी तशी कोणतीही सूचना किंवा माहिती देणारी व्यक्ती उपलब्ध नव्हती. रुग्ण कक्षासमोर रुग्णवाहिका उभी केल्यानंतर पीपीई कीट घालून येण्यास येथील डॉक्टरांना तब्बल 25 मिनिटे लागली. व्यवस्थापकांकडून डॉक्टर पीपीई कीट घालत असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू, कोविड कक्षामध्ये डॉर्क्ट्सच नसल्याचे समोर आले. याबाबत डॉ. साबणे व अन्य डॉक्टरांनी तीब्र शब्दात नाराजी व्यक्त करीत व्यवस्था सुधारण्याविषयी व्यवस्थापनाला सुचना दिल्या. रुग्णवाहिकेमध्ये असलेली ज्येष्ठ महिला तोंडाला ऑक्सिजन लावून बसलेली होती. बराच वेळ डॉक्टरांची वाट पाहिल्यावर त्या शेवटी रुग्णवाहिकेतच आडव्या झाल्या. डॉक्टर आल्यानंतर त्याला व्हिलचेअरवरुन कोविड कक्षात नेण्यात आले. पहिल्याच दिवशी येथील नियोजनाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला.
=====
जम्बो कोविड सेंटर उभे करुन हस्तांतरीत करण्याची जबाबदारी पीएमआरडीएची होती. तर, पर्यवेक्षकीय जबाबदारी पुणे महापालिकेची आहे. यासोबतच औषधे पुरविण्याची जबाबदारीही पालिकेकडे देण्यात आली आहे. याठिकाणची वैद्यकीय व्यवस्था चालविणे, वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ आणि उपचार ही जबाबदारी ‘लाईफलाईन’ या एजन्सीची आहे. तर, येथील लॅबची जबाबदारी क्रष्ना या संस्थेला देण्यात आली आहे.
=====
महापालिकेकडून 15 दिवसांच्या औषधांचा साठा रुग्णालयाला देण्यात आला आहे. यासोबतच फेसशिल्ड, मास्क, पीपीई कीटही महापालिकेकडून पुरविण्यात आले आहे.
=====
1. 600 ऑक्सिजन बेडपैकी 300 ऑक्सिजन बेड तयार, व्हेंटिलेटरसह आयसीयू कक्षही रुग्णांसाठी तयार
2. जम्बो कोविड सेंटरमधील खाटांची उपलब्धता ‘डॅशबोर्ड’वर समजणार
3. एकाच ठिकाणी ‘एक्स-रे’, ‘स्वाब तपासणी’, ‘लॅब’ची सुविधा
4. संपुर्ण रुग्णालय परिसर सीसीटीव्ही सुरक्षित
5. महापालिकेकडून चार पुर्णवेळ डॉर्क्ट्स, एक फार्मासिस्ट तैनात
6. रुग्ण आल्यानंतर त्याची नोंदणी केली जाणार. त्याची तपासणी करुन आयसीयू, व्हेंटिलेटर अगर ऑक्सिजनवर ठेवायचे ते ठरणार.'