Corona virus : पुण्यातील मार्केटयार्ड शुक्रवारपासून अनिश्चित काळापर्यंत राहणार बंद; भुसार बाजार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 10:50 AM2020-04-09T10:50:35+5:302020-04-09T11:09:32+5:30
शुक्रवार १० एप्रिल २०२० पासून फळे, भाजीपाला, कांदा -बटाटा व केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद
पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड उद्या शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशन तसेच कामगार युनियन, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटना यांनी घेतला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड व त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील केला असून कर्फ्यु सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही़ तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने शुक्रवार १० एप्रिल २०२० पासून फळे, भाजीपाला, कांदा -बटाटा व केळीचा घाऊक व्यापार पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आडते असोसिएशनला पत्राद्वारे कळविले असल्याचे आडते असोसिएशनने म्हटले आहे.
मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यु लावण्यात आला आहे. फक्त मार्केट यार्डमध्ये बाहेरुन मालाची आवक होत आहे. व घाऊक व्यापार्यांनाच येथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. बाहेरुन आलेले ट्रक, टेम्पो यांना गटा गटाने आत प्रवेश दिला जात होता.
मार्केटयार्ड बंद होणार आहे. तसेच पुणे शहरातील कर्फ्यु टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बुधवारी सांगितले होते. याच वेळी त्यांनी दहा दिवसांचे सामान भरुन ठेवा, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर आता मार्केटयार्डही बंद झाल्याने शहरात जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सयंम पाळण्याची गरज आहे. किराणा मालाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी अनेकदा दिसून येते. तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे.
फक्त भुसार बाजार सुरु
मार्केटयार्डमधील कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे, केळी बाजार बंद राहणार आहे. फक्त भुसार बाजार सुरु राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीने कळविले आहे.