Corona virus : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज,१५ जुलैपर्यंत राहणार होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:45 PM2020-07-09T20:45:27+5:302020-07-09T21:32:57+5:30
गेल्या शनिवारी मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना तपासणी चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता.ही माहिती स्वतः महापौरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र,रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोना लक्षणे आढळली नाही. त्यामुळे मोहोळ यांना गुरुवारी ( दि. ९) रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले आहे. परंतू,१५ जुलैपर्यंत त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालिका प्रशासन, आरोग्य विभाग,आणि कार्यकर्ते यांच्या साहाय्याने फिल्डवर काम केले होते.त्याच दरम्यान सातत्याने ते बैठका,प्रत्यक्ष भेटी यांच्या माध्यमातून अधिकारी व नागरिक यामधील दुवा म्हणून कार्यरत होते.या दरम्यानच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मोहोळ यांनी उपचारासाठी दाखल होताना लवकर कोरोनावर लवकरात लवकर मात करून पुणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू होईल असा आत्मविश्वास बोलून दाखवला होता.तसेच रुग्णालयातून व्हिडिओ द्वारे संवाद साधताना त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्वतः महापौरांना फोन करून फिल्डवर छान काम केलं आता काळजी घ्या असे सांगितले होते.
मोहोळ यांचा कोरोनासंबंधी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील कोरोना चाचणी केल्यानंतर काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता मोहोळ यांना रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले आहे. मात्र, त्यांना १५ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.
भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण
महापौरांचा अहवाल कोरोनासंबंधी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.