Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:05 PM2020-07-04T13:05:47+5:302020-07-04T13:07:16+5:30
महापालिकेला दरमहा साधारणत: २५ कोटी रूपये अतिरिक्त खर्च येणार
पुणे : पुणे महापालिकेने सुरू केलेल्या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये उत्तम प्रकारच्या सुविधा कोरोनाबाधित रुग्णांना मिळत आहेत. या ठिकाणी असलेला वैद्यकीय कर्मचारीवर्गही अहोरात्र रुग्णसेवेकरिता कार्यरत आहे. येथील उत्तम सुविधांमुळे रुग्णही आनंदी असल्याचे समाधान असल्याच्या भावना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
एकीकडे महापालिकेचे कोविड केअर सेंटर रूग्ण सेवेत अहोरात्र कार्यरत असतानाच, शहरातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे शहरी गरीब अंशदायी आरोग्य योजनेत कोरोनाच्या रूग्णांचेही ५० टक्के बिल महापालिका भरणार आहे. याबाबत सदर योजनेत उपचार मिळू शकणाऱ्या शहरातील ८० हॉस्पिटललाही कळविण्यात आले आहेत. त्यामुळे बिल वेळेत मिळत नाही यामुळे उपचारास नकार देणाऱ्या, शहरातील या ८० खासगी हॉस्पिटलमध्ये योजनेंतर्गत कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल होता येणार आहे. या रूग्णांचे ५० टक्के बिल शहरी गरीब योजनेंतर्गत महापालिका भरणार असून, याकरिता महापालिकेला दरमहा साधारणत: २५ कोटी रूपये अतिरिक्त खर्च येणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील काही खासगी हॉस्पिटलकडून कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या अवास्तव बिलांवर नियंत्रण आणून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. तसेच याबाबतच्या तक्रारी राज्य शासनाकडे केल्या आहेत, असेही मोहोळ यांनी सांगितले.
---------------------------