Corona virus : पुणे महापालिका खासगी लॅबला देणार नोटिसा; वेळेत माहिती देण्यात कुचराई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 08:13 PM2020-07-17T20:13:37+5:302020-07-17T20:14:42+5:30
खासगी लॅबकडून पालिकेच्या आदेश व सुचनांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समोर
पुणे : नागरिकांच्या स्वाब तपासणीची तसेच पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती वेळेत न देणाऱ्या सहा खासगी लॅबला महापालिका नोटीस बजावणार आहे. यासोबतच या खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह निदानाची टक्केवारी पालिकेच्या टक्केवारीच्या दुप्पट असल्याने यामागील 'नेमक्या' कारणांचाही शोध घेतला जाणार आहे. येत्या सोमवारी खासगी लॅबचालकांसोबत यासंदर्भात बैठक बोलावण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
कोरोनाचा आकडा मागील दोन दिवसांपासून दीड हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारी एकाच दिवसात १४१६ तर गुरुवारी एकाच दिवसात एकदम १८१२ कोरोना रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गुरुवारी निष्पन्न झालेल्या १८१२ रूग्णांपैकी तब्बल ८०० रुग्ण हे खासगी लॅबमधील तपासणीमध्ये निष्पन्न झालेले होते. परंतु, हे ८०० रुग्ण मागील तीन चार दिवसातील तपासणीमधून निष्पन्न झालेले रुग्ण होते. या पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती त्याच दिवशी अगर २४ तासांच्या आत पालिकेला कळविणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी लॅबकडून ही माहिती पालिकेला वेळेत देण्यात आली नाही. त्यामुळे तीन दिवसातील हे पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारच्या आकड्यांमध्ये एकदम वाढले. खासगी लॅबकडून याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचे आणि पालिकेच्या आदेश व सुचनांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे पालिकेने या सर्व खासगी लॅबला नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॅबकडून उशिरा माहिती देणे, पॉझिटिव्ह रूग्णांची २४ तासांच्या आत माहिती न देणे, पॉझिटिव्ह रुग्ण निदानाचा दर ४० टक्के असणे यामागील कारणांचा खुलासा मागविला जाणार आहे. लॅबचालकांची येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली असून या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
-----------
खासगी लॅबचा 'कन्फर्मेशन रेट' पालिकेपेक्षा अधिक कसा?
खासगी लॅबकडे तपासणीसाठी जाणाऱ्या नागरिकांमधून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण तब्बल ४० टक्के आहे. तर, पालिकेचे प्रमाण २२ टक्के आहे. खासगी लॅबची टक्केवारी अधिक असण्यामागे काहीतरी गडबड असण्याची शक्यताही अधिकारी व्यक्त करीत आहेत. या लॅबकडील उपकरणे, साधने, किट जुनी आहेत की नवीन, नेमकी कशा प्रकारे तपासणी केली जाते आदींची माहिती घेतली जाणार आहे. या लॅब्सचा कन्फर्मेशन रेट अधिक कसा काय याचीही पडताळणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.