Corona virus : पुणे महापालिकेचे आता खासगी डॉक्टरांनाही ५० लाखांचे 'विमाकवच'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:18 AM2020-07-29T11:18:00+5:302020-07-29T11:18:20+5:30
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना विमा सुरक्षा कवच व कोरोनाची बाधा झाल्यास उपचाराचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील खाजगी डॉक्टर यांचीही सेवा उपलब्ध व्हावी. यासाठी पुणे महापालिकेकडून, शहरातील खासगी डॉक्टरांनाही कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना अंशदायी योजनेंतर्गत उपचाराचा खर्च तसेच ५० लाख रूपयांचे विमा कवच मिळणार आहे.
कोरोना संकटात काम करणाऱ्य खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना अंशदायी योजनेंतर्गत उपचाराचा खर्च तसेच ५० लाख रूपयांचे विमा कवच देण्याच्या या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या आणि तातडीने विमा कंपनीच्या नियुक्तीसाठी अल्पकालीन निविदा काढावी, व ही निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे आणावी, असे आदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सेवांमध्ये महापालिकेला अधिकाअधिक डॉक्टर्सची सेवा उपलब्ध व्हावी याकरिता प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने नुकतीच खासगी डॉक्टर संघटनांसोबत बैठकही घेण्यात आली होती.या बैठकीत झालेल्या चर्चेत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना विमा सुरक्षा कवच व कोरोनाची बाधा झाल्यास उपचाराचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सदर प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली असली तरी, कोरोनाच्या काळात खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, फॅमिली डॉक्टर्स किती आहेत, किती डॉक्टर्स स्वतंत्र व्यवसाय करून, अन्य रुग्णालयातही सेवा देत आहे. याची माहिती घेऊनच विमा कंपनी नियुक्तीसाठी अल्पकालीन निविदा राबवावी असेही समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
--------------