Corona virus : पुणे महापालिकेची 'डॅशबोर्ड' आकडेवारीशी जुळवाजुळवीसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 17:13 IST2020-07-31T17:09:42+5:302020-07-31T17:13:14+5:30
महापालिकेची आकडेवारी आणि डॅशबोर्डवरील आकडेवारी जुळत नसल्याने आकडेवारीचा गोंधळ अद्यापही कायम.

Corona virus : पुणे महापालिकेची 'डॅशबोर्ड' आकडेवारीशी जुळवाजुळवीसाठी धडपड
पुणे : महापालिकेकडून दररोज कोरोना रुग्णांसंदर्भात प्रसिध्दीस दिल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये व्हेंटिलेटर्सवरील रुग्णांची संख्या वाढल्याचे दर्शविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उपलब्ध खाटांची संख्या 'डॅशबोर्ड' सोबत जुळविण्याचा खटाटोप पालिकेने चालविल्याचे दिसून येत आहे.
पुणे महापालिकेकडून दररोज शहरातील कोरोना रुग्णांची संख्या, सक्रीय रुग्ण, घरी सोडण्यात आलेले रुग्ण, कोरोना मृत्यू यासह व्हेंटिलेटर्सवरील रुग्ण, आयसीयूमधील रुग्ण याची माहिती दिली जाते. या फॉरमॅटमध्ये बदल करण्यात आला असून आयसीयूमधील व्हेंटिलेटर्सवरील रुग्ण, आयसीयूमधील विना व्हेंटीलेटर्सचे रुग्ण, आॅक्सिजनवर ठेवण्यात आलेले रुग्ण अशी वर्गवारी करुन त्याचा आकडा देण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने व्हेंटिलेटर्सवरील आकडेवारी वाढविल्याची शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.
शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील आयसीयू, व्हेंटि लेेेटर्स, आॅक्सिजन बेडची उपलब्धता दर्शविण्यासाठी आणि त्याची माहिती नागरिकांना समजण्याकरिता डॅशबोर्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतू, महापालिकेची आकडेवारी आणि डॅशबोर्डवरील आकडेवारी जुळत नसल्याने आकडेवारीचा गोंधळ अद्यापही कायम आहे. हा गोंधळ दूर करण्याकरिता डॅशबोर्डाच्या टर्मिनोलॉजीप्रमाणे आता पालिका व्हेंटिलेटर्स आणि आॅक्सिजनवरील रुग्णांची माहिती देणार आहे. एकंदरीत पालिका डॅशबोर्डावरील आकडेवारीसोबत स्वत:चे आकडे जुळविण्याचा खटाटोप करीत असल्याचे चित्र आहे.
=====
कोरोनाबाबतच्या प्रसिद्धीपत्रकाच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. रुग्णालयील आयसीयूमधील व्हेंटिलेटर्सवरील असणारे व नसणारे रुग्ण, रुग्ण, आॅक्सिजनवरील रुग्णांचा आकडा डॅशबोर्डासोबत लिंक करण्यात येत आहे. यापूर्वीही आकड्यांमध्ये तफावत नव्हती आणि आजही नाही. केवळ सुटसुटीतपणा आणून दोन्हींचे स्वरुप सारखे करण्याचा प्रयत्न केला आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका