Corona virus in pune : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गेली ८ हजारांच्या पार; दिवसभरात १८१ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:15 PM2020-06-08T20:15:31+5:302020-06-08T20:20:22+5:30
आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १८५ झाली आहे...
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ हजारांच्या पार गेला असून सोमवारी दिवसभरात १८१ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ०६२ वर जाऊन पोचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १६६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ४८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सोमवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १८१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १८१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ४३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात सोमवारी १३ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३९१ झाली आहे. दिवसभरात एकूण १६६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ११० रुग्ण, ससूनमधील ०९ तर खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १८५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४८६ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २१०८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६० हजार ७९८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १७२८, ससून रुग्णालयात १५२ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६०६ रुग्ण उपचार घेत आहेत.