Corona virus : पुणेकरांचा जीव महत्वाचा; प्रशासकीय यंत्रणा सुधारा; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 08:58 PM2020-09-03T20:58:48+5:302020-09-03T21:01:07+5:30
पुण्यात कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार देणे, वैद्यकीय सेवा पुरवणे हे प्रशासनाचे काम आहे..
पुणे : पुणेकर नागरिकांचा जीव वाचवण्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले जावे, ॲम्बुलन्सची कमतरता तातडीने दूर व्हावी, रुग्णांना जेवण, उपचार व इतर वैद्यकीय सोयी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, डॅशबोर्डसाठी दिलेल्या हेल्पलाइन नंबरसाठी २४ तास व्यक्तीची नियुक्ती करावी, स्वाब टेस्टचे अहवाल लवकर मिळावेत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांचा कचरा गोळा केला जावा यांसारख्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महापालिकेत आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेत गुरुवारी ( दि.३ ) खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आत्मक्लेश आंदोलनात आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पर्वती विभाग अध्यक्ष नितीन कदम, नगरसेवक विशाल तांबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांबाबतचे निवेदन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले.
खासदार चव्हाण म्हणाल्या, पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास पालिकेचा अकार्यक्षम कारभार जबाबदार असून या कारभाराचा निषेध नोंदवीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या आरोग्य पथकाने दिलेल्या निर्देशानुसार, पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने पुणेकरांसाठी अत्यंत कमी कालावधीमधे जंम्बो कोवीड सेंटर उभे केले. येथील रुग्णांना उपचार, वैद्यकीय सेवा, सुविधा पुरवणे हे स्थानिक प्रशासनाचे काम आहे.स्वाब टेस्टचे अहवाल लवकर मिळावेत तसेच गृह विलगिकरणातील रुग्णांचा कचरा गोळा केला जावा. तसेच स्थानिक प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.