Corona Virus : पुण्यातील 'कमिन्स' कंपनी कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ; महापालिकेकडून ३ दिवस कामकाज बंद ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 05:35 PM2021-05-20T17:35:51+5:302021-05-20T23:14:59+5:30
गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत कमिन्स कंपनीत २४० कामगारांना कोरोनाची लागण व त्यातील ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पुणे : पुणे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसोबतच औद्योगिक कंपन्यांसाठी निर्बंध कडक करण्यात आले आहे. या सरकारी निर्बंधांचे पालन होत नसल्यास महापालिकेकडून कारवाई देखील सुरु आहे. पुण्यातील डहाणूकर कॉलनी येथे असणाऱ्या 'कमिन्स' कंपनीत देखील कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून ५० कोरोना रुग्ण आढळून आले आहे. याच कारणास्तव कमिन्स कंपनीला 'कोरोना हॉटस्पॉट' क्षेत्र म्हणून जाहीर करताना आजपासून ( दि.२०) ते २३ मे असे ३ दिवस कंपनी बंद ठेवण्याचे आदेश कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने दिले आहे.
कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांनी याबाबत कमिन्स कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी यांना पत्र पाठवले आहे. यात राज्य शासन व पुणे महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे कंपनीत काटेकोरपणे पालन होत नसल्याचे नमूद केले आहे. तसेच गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत कंपनीत जवळपास २४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यातील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आणि सध्याच्या घडीला ५० कामगार कोरोना बाधित आहे.याचवेळी कंपनीतील कामगारांची जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने कामगारांची गर्दी होत आहे. यातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे.
याच पार्श्वभूमीवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सचिन तामखडे यांनी पाठ्वलेल्या पत्रात कंपनीचे कामकाज तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्याचसोबत सर्व कामगारांची कोविड चाचणी करून त्याचा अहवाल २२ तारखेपर्यंत सादर करावा. तसेच कामगारांना फेसशिल्ड मास्क उपलब्ध करून देण्यात यावे, कॅन्टीनमध्ये बसून कामगारांना जेवणाला प्रतिबंध करण्यात घालण्यात आला आहे. याचवेळी सर्व कामगारांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश देतानाच कंपनीचा परिसर व यंत्र सामग्री यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याचेही सक्त ताकीद प्रशासनाने कंपनीला दिली आहेत.
कंपनीकडूनही अधिकृत दुजोरा
दरम्यान, कमिन्स कंपनीकडूनही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून पुणे मनपाकडून नोटीस मिळाल्याचं मान्य करण्यात आलं आहे. संपूर्ण घटनेवर कंपनीचं बारकाईनं लक्ष असून आवश्यक अशी सर्व पावलं उचलली जात असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. कोरोना संबंधिच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कंपनीनं यावेळी कोरोना संबंधी घेतली जाणारी काळजी आणि सुरक्षा नियमांची सविस्तर माहितीच प्रसिद्ध केली आहे. यात कंपनीत पूर्णपणे सॅनिटायझेशन आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा उल्लेख करण्यात आला आहे.