corona virus :कोरोनामुळे पुण्यातील शाहीनबाग आंदोलन तात्पुरते स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:56 PM2020-03-24T15:56:06+5:302020-03-24T16:00:09+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील कोंढवा भागातील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा तितक्याच ताकदीने आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली आहे.
पुणे :कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील कोंढवा भागातील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा तितक्याच ताकदीने आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीतील शाहीनबाग भागाप्रमाणे देशभरातील विविध भागात महिला एकत्र येऊन आंदोलन करत आहेत, आपला विरोध प्रदर्शित करत आहेत. यात प्रामूख्याने मुस्लिम समाजाच्या महिलांचा समावेश आहे. पुण्यातही दोन ठिकाणी याच विषयावर आंदोलन सुरु होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर आंदोलकांची संख्या कमी केली गेली. अखेर कलम १४४ लागू झाल्यावर मात्र आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. एकूणच आरोग्याचा वाढता प्रश्न बघता आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
याबाबत आंदोलन करणाऱ्या गजाला शेख म्हणाल्या की, 'सुमारे ७० दिवस आम्ही आंदोलन केले. जमावबंदी लागू झाल्यावरही आम्ही पाच महिला आंदोलन करत होतो. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारला मदत करणे गरजेचे वाटले म्हणून आंदोलन तात्पुरते थांबवले आहे. कोरोना प्रादुर्भाव कमीज आल्यावर पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा आमचा निश्चय आहे. कोरोनाबाबत आम्हीही काळजी घेतली असून आंदोलन सुरु असताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोंढवा पोलिसांनी शाहीनबागच्या धर्तीवर सुरू असलेलं कोंढव्यातील आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मागील एक आठवड्यापासून हे आंदोलन बंद आहे. आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती पोलिसांनाही दिलेली नाही'.