Corona virus : कोरोनाबाधित ' त्या ' महिलेच्या संपर्कात आलेली पानशेत परिसरातील गावे क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 05:32 PM2020-03-23T17:32:35+5:302020-03-23T17:58:42+5:30
तालुक्यातील सर्वच गावांत तपासणी
वेल्हे : तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. पुण्यात वडगाव परिसरात बाधित झालेल्या ४१ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या पानशेत परिसरातील गावांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्या परिसरातील व तालुक्यातील सर्वच गावांमधील नागरिकांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव व तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले.
वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरात कोरोनाची लागण झालेल्या महिला रुग्णाचा वावर झाल्याने त्या महिलेचा संपर्क आलेल्या व्यक्ती व गावातील सभोवतालच्या परिसर येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. ही महिला ज्या-ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली, त्यांच्याबरोबरच परिसरातील नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
वेल्हे तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. पानशेत परिसरात सापडलेली महिला ही पुणे शहरात वास्तव्यास आहे. ती अंगणवाडी सेविका असल्याने पानशेत परिसरात तिचे येणे-जाणे होते, असे प्रांतधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईनचे शिक्के मारून घरातच त्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची नियमित तपासणी सुरू आहे. पानशेत परिसरातील गोरडवाडी, साईव्ह, पडाळवाडी, मोसे, वाणगेवाडी आदींसह परिसरातील गावांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या ठिकाणी चेक पोस्ट बसविण्यात आले असून बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आजअखेरपर्यंत कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
जिल्हा स्तरावरून २७ पथके या परिसरात तपासणी करीत आहेत. तालुक्यातील संपूर्ण गावांची तपासणी करण्याचे काम सुरू असून क्वारंटाईन गावामध्ये सोडियम क्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे. गावागावांमध्ये स्पीकर लावून सूचना देण्यात आली आहे. घरोघरी सॅनिटायझरचे वाटपदेखील करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी सांगितले.
तालुक्यातील अंबवणे, मार्गासनी, पाबे, पानशेत आणि क्वारंटाईन असलेल्या गावांमध्ये नाकांबदी करण्यात आली आहे. बाहेरून येणाºयांना या गावांत प्रतिबंध करण्याचे काम सुरू आहे. समाजमाध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित करू नये. तसे केल्यास गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली.
कोरोनाबाधित महिला ही वेल्हे तालुक्यात आली होती; मात्र १३ मार्चनंतर तिचा वेल्ह्यात संपर्क झाला नाही. क्वारंटाईन केलेल्या गावांमध्ये अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तालुक्यात प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, कोतवाल, शिपाई आदींचे पथक तयार करण्यात आले असून गावातील प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. एखादा संशयित आढळल्यास ताबडतोब प्रशासनाला कळविण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
वेल्ह्यात ८७ क्वारंटाईन असल्याची अफवा दिवसभर सुरू असल्याने वेल्हे तालुक्यात सगळीकडे शांतता होती. विंझर, मार्गासनी, अडवली, अस्कवडी या गावांनी गावात येणारे रस्तेच बंद केले आहेत.