Corona virus : कोरोनातून बरे झालेले पोलीस करणार रुग्णांचे समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 05:40 PM2020-07-20T17:40:38+5:302020-07-20T18:18:41+5:30
पुणे पोलीस दलातील जवळपास सव्वा दोनशे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण
पुणे : कोरोनाची लागण झाल्यानंतर नागरिक घाबरुन जातात. त्यात लोकांकडून अनेक बाबी ऐकण्यात आल्याने त्यांचा धीर खचून जातो, अशावेळी त्यांचे समुपदेशन करुन त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी नवी ताकद देण्याचा प्रयत्न पुणेपोलिसांच्या मनोभरोसा या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
पुणे पोलीस दलातील जवळपास २६९ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १८५ पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यातील बहुतांश कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. या कर्मचार्यांच्या अनुभवाचा उपयोग शहरातील कोरोना रुग्णांना करुन देण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी मनोभरोसा हा उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत एक कार्यशाळा सोमवारी पोलीस आयुक्तालयात झाली. यामध्ये कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले ३५ कर्मचारी आणि ज्ञानप्रबोधिनीचे ३० समुपदेशक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेला डॉ. कविता करेर, डॉ. ममता व्यंकटेशम, त्यांची कन्या नेहारिका व्यंकटेशम, ज्ञानप्रबोधिनीच्या अनघा लवळेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी समुपदेशन कसे करावे, याची माहिती या कार्यशाळेत दिली.
या उपक्रमासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना अनेक समस्या समोर येत आहे. त्यातून कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक खचून जात आहे. कोरोना बाधित झालेले आणि त्यातून पूर्णपणे बरे झालेले हे पोलीस कर्मचारी फोनद्वारे कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क साधतील. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतील. या परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आपले अनुभव शेअर करतील. त्यातून धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
कोरोनाविषयी लोकांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. त्यातून एखाद्याला लागण झाली तर ते खचून जातात. आपल्या घरच्यांचे कसे होईल, अशी त्यांना चिंता वाटत असते. अशावेळी त्यांचे मानसिक खच्चीकरणही होत असते. त्यांना आधार देण्याचा व आम्ही यातून बरे झालो आहोत, तुम्हीही बरे होऊ शकाल, असा विश्वास देण्यासाठी हा मनोभरोसा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यातून रुग्णाचा कोरोनाशी लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर