Corona virus : ससूनच्या आवारात असलेले "कोविड रुग्णालय" दहा दिवसांतच फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:02 PM2020-04-25T21:02:22+5:302020-04-25T21:03:16+5:30
पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेले कोविड रुग्णालय दहा दिवसांतच फुल्ल झाले आहे. त्यामुळे तेथील रुग्ण अन्यत्र हलविले जात ...
पुणे : ससून रुग्णालयाच्या आवारात असलेले कोविड रुग्णालय दहा दिवसांतच फुल्ल झाले आहे. त्यामुळे तेथील रुग्ण अन्यत्र हलविले जात आहेत. अकरा मजली इमारत उभी असूनही सध्याच्या परिस्थितीत पांढरा हत्ती ठरत आहे. तिथे सध्या केवळ ११३ रुग्ण असून त्यापैकी ३१ रुग्ण गंभीर आहेत. तर ३३ रुग्ण सणस मैदान येथील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर ससून रुग्णालयाच्या आवारातील नवीन अकरा मजली इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर तिथे तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत हे काम पुर्ण करून दि. १३ एप्रिलला ही इमारत प्रशासनाला ताब्यात दिली. त्यानंतर तिथे वेगाने रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात अतिदक्षता विभागात ५० व विलगीकरण कक्षात १०० अशा एकुण १५० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. पण त्यानंतर ही क्षमता वाढलेली नाही. एकीकडे रुग्ण वाढत असताना कोविड रुग्णालयाच्या क्षमतेत वाढ होत नसल्याने रुग्णांना अन्यत्र हलविण्याचे वेळ प्रशासनावर आली आहे. तसेच जागेअभावी आलेल्या रुग्णांना नकार द्यावा लागत असल्याची परिस्थती निर्माण झाली आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ह्यरुग्णालयातील स्थिर स्थितीतील कोरोनाबाधित ३३ रुग्ण सणस मैदान येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या ११ मजली इमारतीत सध्या ११३ रुग्ण दाखल आहेत. सणस मैदान येथील रुग्णांवरही ससूनमधील डॉक्टरांकडूनच उपचार करण्यात येत आहेत. याविषयी ४४ संशयित रुग्ण नवीन इमारतीत आहेत. एकुण बाधित रुग्णांपैकी ३१ गंभीर असून तिघे व्हेंटिलेटरवर आहेत.ह्ण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या गंभीर स्थितीतील रुग्णांना प्राधान्य दिले जात आहे. स्थिर असलेले रुग्ण जागेअभावी इतर ठिकाणी पाठविले जात आहेत. काहीवेळा गंभीर रुग्णांनाही जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही इतरत्र पाठवावे लागते.
-----------------
रुग्णालयाला जवळपास ४०० रुग्णांची व्यवस्था होईल, यानुसार चार मजले तयार करून दिले आहेत. पण कोरोनामुळे बेडमधील अंतर वाढल्याने ही क्षमता कमी झाली आहे. इतर मजले सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. सध्या कामगार न मिळण्यासह इतरही काही अडचणी आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनी सांगितले.
------------