Corona virus : पुण्यातील ससून रुग्णालयात 'अँटिजेन टेस्ट'मुळे गंभीर रुग्णांना मिळतोय दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:50 PM2020-08-07T12:50:19+5:302020-08-07T12:51:18+5:30
काही मिनिटांच्या निदानामुळे उपचाराला गती
पुणे : ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेले गंभीर स्वरूपाचे संशयित रुग्ण, गर्भवती महिला, अतिगरजेच्या शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची अँटिजेन कीटद्वारे काही मिनिटांत कोरोना चाचणी होत आहे. त्यामुळे कोरोनाचे लवकर निदान होत असल्याने या रुग्णांना तातडीने योग्य उपचार देणे शक्य होत आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच संशयितांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. त्यामुळे मुख्य प्रयोगशाळेवरील ताणही कमी झाला आहे.
ससून रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. येथील सर्व रुग्णांच्या कोविड चाचण्या ससूनमधील प्रयोगशाळेतच केल्या जातात. पण रुग्णसंख्या वाढू लागल्याने काही दिवसांपासून अॅन्टीजेन चाचण्या तसेच ‘सीबीनॅट’ चाचणीही सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांप्रमाणेच नॉन कोविड रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे संशयितांची चाचणी होईपर्यंत त्यांना संशयित म्हणूनच उपचार केले जातात. त्यातच रुग्णालयामध्ये गंभीर अवस्थेत येणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. तसेच गर्भवती महिलांची प्रसुती, तातडीच्या शस्त्रक्रियाही कराव्या लागतात. त्यांच्यासाठी कोरोनाचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. अँटिजेन चाचणी ५ ते १० मिनिटांतच होत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत आहे.
अॅन्टीजेनमध्ये एखादा संशयित रुग्ण निगेटिव्ह आल्यास सीबीनॅट किंवा ‘आरटी-पीसीआर’ला प्राधान्य देण्यात येते. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित रुग्णांना कोविड किंवा नॉन कोविड कक्षात हलविले जाते. मुख्य प्रयोगशाळेतील आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमताही आता वाढली आहे. चोवीस तासात सुमारे ८०० चाचण्या होत आहेत. गुरूवारपर्यंत प्रयोगशाळेत एकुण ३६ हजार २४३ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये ५ हजार ८७२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रयोगशाळेची क्षमता टप्प्याटप्याने वाढविली जात आहे. दररोज १२०० ते १३०० चाचण्यांपर्यंत ही क्षमता नेण्याचे नियोजन आहे. ससूनसह सातारा, नगर आदी भागातील भागातील नमुनेही काहीवेळा येत असतात.
--------------
ससुनमधील कोविड प्रयोगशाळेची सद्यस्थिती -
सध्याची क्षमता (२४ तास) - सुमारे ८०० चाचण्या
गुरूवारपर्यंत चाचण्या - ३६,२४३
बाधित रुग्ण - ५८७२
बाधितांचे प्रमाण - १६.२० टक्के
-------------