परदेशातल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट;नियमांचे पालन करून साधेपणाने होणार बाप्पांची आराधना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:03 PM2020-08-14T12:03:41+5:302020-08-14T12:07:29+5:30
काही देशांमध्ये सुरू असलेले लॉकडाऊन, धार्मिक उत्सवावरील बंदी, कडक नियमावली यामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत.
पुणे: यंदा कोरोनाचे संकट जगभरात ओढवल्यामुळे दरवर्षी परदेशामध्ये वाजतगाजत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र विविध देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांसह महाराष्ट्र मंडळांतर्फे यंदा देखील गणेशोत्सव धुमधडाक्यात नसला तरी साधेपणा साजरा केला जाणार आहे.
विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न जगभरातील मराठी बांधव करीत आहेत. दरवर्षी जगभरातील विविध देशांमध्ये या मंडळींकडून सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. ढोलताशांच्या निनादात मिरवणुका, पारंपरिक वेशभूषा, सनईचे सूर, अशा मंगलमयी वातावरणात श्रींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. मात्र यंदा कोरोनाने जगाला विळखा घातला आहे.
काही देशांमध्ये सुरू असलेले लॉकडाऊन, धार्मिक उत्सवावरील बंदी, कडक नियमावली यामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही नियमांचे योग्यप्रकारे पालन करूनच गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे विविध देशातील मराठी बांधवांनी' लोकमत' ला सांगितले. .....
अमेरिकेत विविध शहरात वेगवेगळे नियम लागू आहेत. गर्दी न करणे, सहा फूट अंतर पाळणे, बाहेर जाताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. इथे गणेशोत्सव धुमधडाक्यात नसला तरी नियमांचे योग्यप्रकारे पालन करून साजरा केला जाणार आहे. दरवर्षी माझ्याकडे गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि जवळपास 500 लोक दर्शनाला येतात. पण यंदा आम्ही इको फ्रेंडली मूर्ती आणणार आहोत. झूम आणि एफबी लाईव्ह च्या माध्यमातून आरती करणार आहोत- विद्या जोशी, शिकागो, अध्यक्ष बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका ......
लंडन मध्ये जवळपास ७ ते १० मराठी मंडळे आहेत. सर्व मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहेत. पण तो रस्त्यावर वाजतगाजत न करता घरगुती स्वरूपात केला जाणार आहे. गणेशोत्सवामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात. पण यंदा दर्शनासाठी वेळा निश्चित केल्या जाणार आहेत.माझ्याकडे देखील दीड दिवसांचा गणपती बसतो. 70 ते 80 लोक दर्शनाला येतात पण यंदा 40 ते 45 लोकांची मर्यादा घातली आहे. एकेक तासाच्या अंतराने दर्शन घेण्याची परवानगी दिली जाणार आहे.एका वेळेला केवळ 8 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल
- सचिन कदम, लंडन
.....
कतार हा मुस्लिम देश आहे. इथे इतर धर्मीय मंडळी खुलेपणाने कोणतेही उत्सव साजरे करू शकत नाही. तरी मराठी बांधव फारसा गाजावाजा न करता गणेशोत्सव साजरा करतात. जून जुलै महिन्यामध्ये सरकारकडून उन्हाळी सुट्टी जाहीर होते. मराठी बांधव सुट्टीसाठी भारतात जातात आणि गणेशोत्सवासाठी मूर्ती घेऊन येतात. पण यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोकांना भारतात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे घरातल्या मातीपासून लोकांना मूर्ती करावी लागणार आहे. तर काही कुटुंबांनी कायमस्वरूपी मेटलची मूर्ती आणून ठेवली आहे. त्याची ते पूजा करणार आहेत. लॉकडाऊन काहीसे शिथिल केल्याने पाच लोकांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
- अविनाश गायकवाड, कतार
.........
गेल्या पाच वर्षांपासून आम्ही मस्कत मराठी मित्रमंडळ चालवित आहोत. पंचधातूची गणेश मूर्ती कायमस्वरूपी बसवून त्याचे छोटेसे मंदिर निर्मित केले आहे. गणेशोत्सवात छोटी मूर्ती आणून त्याची पूजा अर्चा केली जाते. छोटासा हॉल आहे तिथे धार्मिक कार्यक्रम केले जातात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. किमान मंदिरात गणपती बसवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. पण अद्याप परवानगी मिळालेली नाही. लॉकडाऊन जर वाढले आणि परवानगी मिळाली नाही तर गणेशोत्सव कसा साजरा करायचा? असा आमच्यासमोर प्रश्न आहे
- संदीप कर्णिक, अध्यक्ष, मस्कत मराठी मित्र मंडळ
.......
दरवर्षी पुण्यातून विविध देशांमध्ये गणेश मूर्ती पाठवल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या लॉकडाऊन काळात देशविदेशपातळीरील कुरिअर सेवा बंद होती.यातच डीएचएल वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये कर्मचारी वर्ग देखील कमी होता. त्यामुळे कुरिअरचे प्रमाण कमी झाले. क्वचितप्रसंगी अनेक मूर्ती एकत्रितपणे विमान किंवा कार्गोद्वारे पाठवून त्या त्या देशात त्याचे वितरण करण्याची सेवा देण्यात येते. पण विमानाने मूर्ती पाठविताना ती तुटण्याची भीती अधिक असते. त्यामुळे विमानाने शक्यतो मूर्ती पाठवल्या जात नाहीत.विविध देशातील मराठी लोकांनी थेट पेण, पनवेलमधील कारखानदारांकडून थेट मूर्ती मागविल्या असण्याची शक्यता आहे.
- दीपक नाडकर्णी, कुरिअर सेवा