Corona virus : खळबळजनक! खेड तालुक्यातील एका कंपनीत तब्बल १२० कामगार 'कोरोना पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:48 PM2020-08-01T18:48:30+5:302020-08-01T18:49:27+5:30
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कामगारांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू..
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील महाळुंगे येथील एका कंपनीत तब्बल १२० कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील बहुतेक राजगुरूनगर व परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत तेराशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तसेच पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून चाकण राजगुरुनगर व तालुक्याच्या ग्रामीण भागातही रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत आहे. चाकण म्हाळुंगे येथील एका कंपनीत तब्बल १२० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या कंपनीने सुमारे सातशे जणांचे स्वॅब घेतले होते. त्यातील १२० जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी सांगितले.
दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे ,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी म्हाळुंगे येथील कंपनी व्यवस्थापनाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले कामगार कोण कोणत्या परिसरातील आहे. याबाबत छाननी करण्याचे काम सुरू आहे. तसेच राजगुरुनगर व परिसरातील व ग्रामीण भागातील जवळपास तीस ते पस्तीस कामगार या कंपनीत कामास होते. त्यामुळे या कामगारांच्या गावीही भितीदायक वातावरण वाटू लागले आहे.
कंपनी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने काही दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,या एकशे वीस जणांच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आल्या आहेत हे शोधणे प्रशासनाला आव्हानात्मक ठरणार आहे.