Corona virus:संतापजनक! पुण्यात 'कोरोना वॉरियर्स'च्या जेवणात निघाले झुरळ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:41 PM2020-07-03T15:41:37+5:302020-07-03T15:46:25+5:30
कोरोनाची ड़्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पुणे : कोरोना रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या कोरोना वॉरियर्सच्या जेवणात झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारच्या जेवणात झुरळ तर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या प्रसंगी अळई निघाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव नाराजी आहे. या अगोदर ज्या कंपनीला जेवणाचे कंत्राट देण्यात आले होते त्यांच्या जेवणात देखील हा प्रकार उघकीस आला होता. आता नवीन कंत्राट असणाऱ्या एका खासगी कंपनीकडून अशा पध्दतीचे निकृष्ट जेवण दिले गेल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी निवेदन दिले आहे.
ससून रुग्णालयात तसेच रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. एका शिफ्टमध्ये साधारण 150 ते 200 कर्मचारी काम करतात. त्यांना कोरोनाची ड़्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र ते जेवण खाण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. त्याबद्द्ल तक्रार केल्याने प्रशासनाकडून जेवणाचे कंत्राटदार बदलण्यात आले. यानंतर नव्याने कंत्राट देण्यात आलेल्या एका कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली न गेल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
बुधवारी दुपारचे जेवण आणण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणाच्या बॉक्समध्ये झुरळ आढळले. तर शुक्रवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी देण्यात आलेल्या सँडविच मध्ये अळी असल्याचे त्यांनी जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या लक्षात आणून दिले. आता यावर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो याच्या प्रतिक्षेत कर्मचारी वर्ग आहे. यापूर्वी देखील रुग्णालयात कोरोना रुग्ण येण्यास सुरुवात झाल्यापासून ज्या वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती कोवीड 19 मध्ये काम करण्यासाठी झाली त्यात अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे जे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले काम करीत आहेत त्यांना पुन्हा 'ड्युटी' करावे लागत असल्याची तक्रार कर्मचारी संघटनेने केली आहे.
.............................................
दोषींवर कारवाई करा
आरोग्य प्रशासन आमच्या जीवाशी खेळत आहे. कामाचे वाढवलेले तास, त्याचा मोबदला न देणे, असे प्रकार सुरु आहेत. यावर कुणी आवाज उठवला तर त्याच्यावर कारवाई होते. मात्र जे दोषी आहेत त्यांना कुणी शासन करणार आहे की नाही ? दिवसरात्र आम्ही सफाई कामगार याठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी काम करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याविषयी कुणी बोलायला तयार नाही. मागण्यांचे निवेदनाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आताच्या प्रकरणावर ससून प्रशासनाने कठोर अंमलबजावणी न केल्यास कर्मचारी कामबंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत.
- संजय मेमजादे (अध्यक्ष, अंत्योदय कामगार परिषद ट्रेड युनियन, पश्चिम महाराष्ट्र, पुणे)