Corona virus : धक्कादायक ! पुणे महापालिकेचे तब्बल २२ कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 08:18 PM2020-05-13T20:18:55+5:302020-05-13T20:19:28+5:30
आठ जण बरे होऊन घरी गेले असून अन्य चौघांचा उपचारांदरम्यान मृत्यू
पुणे : महापालिका कोरोनासोबत मुकाबला करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करीत असतानाच पालिकेचेच २२ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. यामध्ये पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी ८ रुग्ण बरे झाले असून चार जणांचा मात्र मृत्यू झाला आहे. उर्वरीत दहा जणांवर उपचार सुरु आहेत.
शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. पालिकेच्या जवळपास सर्वच विभागातील कर्मचारी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. पालिकेची यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. नागरिकांचे प्रबोधन, जनजागृती, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह बरीच कामे पालिकेला करावी लागत आहेत. कंटेन्मेंट आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील स्वच्छतेसह अन्य आवश्यक आणि अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी नेमण्यात आलेले आहेत.
ज्या भागात कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत अशा भागात काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आजवर एकूण २२ जणांना लागण झाली असून यामध्ये स्वच्छता कर्मचारी, आया, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, लिपिक, फिटर, बिगारी, आरोग्य निरीक्षक, वाहनचालक, कंत्राटी चालक, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या आजारातून आठ जण बरे होऊन घरी गेले असून अन्य चौघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत दहाजण उपचार घेत आहेत.