corona virus : ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या सासूसाठी जावई झाला ' होम क्वारंटाईन '
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:19 PM2020-03-30T18:19:52+5:302020-03-30T18:20:17+5:30
जानेवारी-2020मध्ये ऑस्ट्रेलियात भावाकडे गेलेल्या सासूबाई कोथरूड येथे वास्तव्यास असून निवृत्त बँक अधिकारी आहे.
पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी परदेशवारी करून आलेल्या आणि आजाराची कोणतेही लक्षणे नसलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन (घरातच वेगळे राहणे) होणे बंधनकारक केले आहे. पुण्यात राहणाऱ्या सासूची देखभाल करण्यासाठी ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या जावयानेही स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. सासूच्या घरी राहून जावई कंपनीचे काम (वर्क फ्रॉम होम) करत आहे.
मानसी कारखानीस असे त्या सासूचे नाव आहे. त्यांचा जावई अभियंता असून एका खासगी कंपनीमध्ये काम करतो. कारखानीस या कोथरूड येथे वास्तव्यास असून निवृत्त बँक अधिकारी आहेत. त्या जानेवारी-2020मध्ये ऑस्ट्रेलियात असलेल्या भावाकडे गेल्या होत्या. तेथून त्या 20 मार्च रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या. परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावर कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे तत्यांची देखील तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. त्यानंतर त्या ठाण्यात वास्तव्यास असलेल्या मुलीकडे जाणार होत्या. मात्र, परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती प्रशासनाकडून ठेवली जात आहे. त्यासाठी पासपोर्टवर (पारपत्र) असलेल्या पत्त्यावर राहणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र पुण्यातील घरी देखभाल करण्यासाठी कोणी नसल्याने जावयाने स्वत:हुन सासूबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
या बाबत बोलताना कारखानीस म्हणाल्या, परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते. त्यासाठी स्वतंत्र बसची सुविधा करण्यात आली होती. डॉक्टर तेथे प्रत्येकाची वैयक्तिक माहिती, कोणता आजार आहे का? गोळ्या सुरू आहेत का? हृदय रोग, मधुमेह या सारखा कोणता जुनाट आजार नाही ना, याचा तपशील आणि पासपोर्ट वरील माहिती नोंदवून घेत होते. येथे तपासणीची व्यवस्थाही उत्तम करण्यात आली होती. मला कोणतीही लक्षणे नसल्याने 3 एप्रिल पर्यंत होम क्वारंटाईनचा शिक्का मारला.
पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. मला एकुलती मुलगी असून पुण्यात मी एकटी राहते. मुलगी, जावई आणि आठ महिन्यांची नात ठाण्याला राहते. अडचण लक्षात घेऊन जावई स्वत: हुन माझ्याबरोबर येण्यास तयार झाले. ते आमच्याच इमारतीत शेजारच्या सदनिकेत राहत आहेत. येत्या 3 एप्रिलपर्यंत कोणती लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्यास बजावले आहे. तसेच 14 दिवसात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून, खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची कपडे आणि जेवणाची भांडी देखील स्वत: स्वच्छ करावी असे सांगण्यात आले आहे. गेल्या सात दिवसात आजाराची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याचे कारखानीस यांनी सांगितले.
माझी देखभाल करण्यासाठी जावई पुण्यात आला आहे. विलग ठेवण्याची मुदत 3 एप्रिल रोजी संपत आहे. माझी नात अवघी 8 महिन्यांची आहे. तिला सांभाळून घरची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. होम क्वारंटाईनची मुदत संपल्यानंतर त्यांना पुणे-ठाणे प्रवास करण्यास मुभा मिळावी.
मानसी कारखानीस